ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना अंतरिम अटकपूर्व मंजूर, सोलापुरात दाखल झाला होता गुन्हा

0

सोलापूर,दि.26: दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे भाषण करून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीचे निकालावर टीका करून बदनामी व जातीय द्वेष निर्माण केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये अॅड. गुणरत्न निवॄत्तीराव सदावर्ते, वय-47 वर्षे, धंदा-वकील, रा. मुंबई यांना अंतरिम अटकपूर्व जामीनावर मुक्त करण्याचा आदेश सोलापूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश व सत्र न्यायाधीश पांढरे यांनी पारित केला.

त्यात हकीकत अशी की, मराठा आरक्षणा विरोधात जयश्री पाटील यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचे मार्फत मुंबई उच्च न्यायालय मध्ये दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डांगरे यांचे न्यायालयातून होऊन दि. 27/6/2019 रोजी न्यायालयाने मराठा आरक्षण वैध ठरविले. त्यानंतर दि. 27/6/2019 रोजी अँड. गुणरत्न सदावर्ते यांनी टीव्ही 9 वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात न्यायमूर्ती रणजित मोरे हे मराठा जातीचे आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या दबावास सेटिंग वेटिंग करून मराठा समाजाचे बाजूने निकाल दिला व जातीय द्वेषातून न्यायमूर्तीची बदनामी केली. तसेच जातीय द्वेष निर्माण केला. अशा आशयाची फिर्याद योगेश नागनाथ पवार यांनी दिनांक 19/4/2022 रोजी फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे दाखल केली.

यात अटक होण्याच्या भीतीने अॅड. गुणरत्न निवृत्तीराव सदावर्ते यांनी अॅड. संतोष न्हावकर यांचेमार्फत सोलापूर येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळणेसाठी धाव घेतलेली होती.
अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावर युक्तिवाद करताना अॅड. संतोष न्हावकर यांनी “अॅड.गुणरत्न सदावर्ते यांनी फिर्यादीची बदनामी केलेली नाही. जवळपास तीन वर्षानंतर राजकीय फायद्यासाठी फिर्याद दाखल झालेली आहे. फिर्यादीने कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करताना शासनाची पूर्व परवानगी घेतलेली नाही व आरोपीस नोटीस दिलेली नाही.” असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले व त्या पृष्ठार्थ गाजलेल्या बाळासाहेब ठाकरे विरुद्ध महाराष्ट्र सरकार या खटल्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा संदर्भ दिला. सदर अर्ज मान्य करून न्यायालयाने अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना रक्कम रुपये 15 हजार रुपयांचे अंतरिम अटकपूर्व जामिनावर मुक्त करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

आरोपीतर्फे अॅड.संतोष न्हावकर,अॅड.वैष्णवी न्हावकर , अॅड.शैलेशकुमार पोटफोडे, अॅड.राहुल रूपनर, अॅड.नागेश थोरात,अॅड.मीरा पाटील, अॅड.अंबिका आडकी, अॅड. योगेश कुरे हे काम पाहत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here