मुंबई,दि.1: शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांचा उल्लेख करत मोठे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकाल 23 नोव्हेंबरला लागला. महायुतीला बहुमत मिळाले. भारतीय जनता पार्टीचे 132 उमेदवार विजयी झाले तर शिवसेनेचे (शिंदे गट) 57 उमेदवार विजयी झाले. शिवसेना (ठाकरे गट) 20 जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. ठाकरेंचे आता निवडून आलेल्या 20 आमदारांपैकी 10 जण आमच्याकडे यायला तयार आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणे योग्य नाही असे शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षांत जनतेत मोठे नावलौकिक मिळवले. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ झाला, शेतकऱ्यांचा भाऊ झाला, तरुणांचा मित्र झाला. या सर्वांचे आशीर्वाद घेऊन हा माणूस लढत आहे. असेही ते म्हणाले.
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
अजित पवार यांना सत्तेत सहभागी करून घेतले. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी विरोध केला नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो होतो. मात्र तरीही त्यावेळी अजित पवार यांना सोबत घेतलं गेलं. पण आम्ही विरोध केला नाही. आम्ही फक्त 81-85 जागा लढलो. अजित पवार महायुतीत आले नसते, तर त्या जागा आमच्या वाटेला मिळाल्या असत्या, तर आता शिवसेनेच्या 90 ते 100 जागा तुम्हाला दिसल्या असत्या.