परराज्यातून बेकायदेशीर मद्य तस्करी केल्याप्रकरणी एकास अटकपूर्व जामीन मंजूर

0

सोलापूर,दि.१७: परराज्यातून बेकायदेशीर मद्य तस्करी केल्याप्रकरणी न्यायालयाने एकास अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यात हकिकत अशी की दि. २९.१२.२०२२ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, गावडी दारफळ ते काटी रोड शिवरत्न नर्सरीच्या समोरील रोडवरून एक कार क्र. एम. एच १२ सि.डी ४५७२ यामधून गोवा राज्यात विक्रीस असणाऱ्या विदेशी मद्याची वाहतूक होणार आहे. त्याप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांची एक टीम सदर रस्त्यावर त्या रात्री दबा धरून बसली.

परराज्यातून बेकायदेशीर मद्य तस्करी

रात्री ११:३० च्या सुमारास एक चार चाकी गाडी वेगाने येताना संशयितरित्या दिसली असता ती थांबविण्यात आली व त्या गाडीची छडती घेतली असता, त्यामध्ये Imperial Blue Whisky च्या एकूण १२०० बाटल्या अंदाजे किंमत दोन लाखाचा माल सापडला. त्याप्रमाणे सदर घटनास्थळी सर्व ऐवज जप्त करून, दोन आरोपींना अटक करण्यात आली. सदर आरोपींकडे चौकशी केली असता, सदरचा सर्व माल संशयित आरोपी स्वप्निल उर्फ मुन्ना भिमराव वसेकर, रा. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जि. सोलापूर यांच्याकडून आणला आहे अशी माहिती मिळाली.

सदर संशयित स्वप्निल उर्फ मुन्ना भिमराव वसेकर यांनी अटक होण्याच्या भितीपोटी ॲड. अभिजीत इटकर व ॲड. प्रथमेश आदलिंगे यांच्यामार्फत अटकपुर्व जामीनासाठीचा अर्ज जिल्हा न्यायालय सोलापूर येथे दाखल केला. सदर जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपीतर्फे ॲड. अभिजीत इटकर यांनी असा युक्तिवाद केला की, सह आरोपीचा कबुली जबाब हा मुख्य आरोपीविरूध्द वापरला जावू शकत नाही. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनाही पोलिस अधिकाऱ्यांसारखेच अधिकार असल्यामुळे त्यांच्यासमोरील कबुली जबाब हा भारतीय पुरावा कायद्यानुसार अजिबात विचारात घेता येत नाही.

सदर युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधिश भोसले यांनी सदर संशयितास अटकपूर्व जामीनावर मुक्त करण्याचे आदेश केले. यात आरोपी स्वप्निल उर्फ मुन्ना भिमराव वसेकर तर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. प्रथमेश आदलिंगे, ॲड. फय्याज शेख, ॲड. राजू राठोड यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here