धुळे,दि.१५: शरद पवार आणि संजय राऊत या फाटक्या आणि जीर्ण झालेल्या नोटा आहेत अशी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. या महाराष्ट्रात जातीवाद पसरवणे, भ्रष्टाचार करणे, अनेक भागांना पाण्यापासून वंचित ठेवणे, मुलभूत सुविधा न देणे, राज्याचे ४ वेळा मुख्यमंत्री काय केले? देवेंद्र फडणवीसांनी एकच वाक्य सांगितले आणि पवारांचा चेहरा डांबरासारखा काळा झालाय. त्यामुळे पवारांकडे उत्तर नाही. ते यावर बोलू शकत नाहीत. ते निरुत्तर आहेत अशा शब्दात गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padlakar) शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला आहे.
‘शरद पवारांचे राजकारण गद्दारीशिवाय आणि…’ आमदार गोपीचंद पडळकर
पडळकर म्हणाले की, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी १५ दिवसांपूर्वी पवारांच्या खेळीनं पहाटेचा शपथविधी झाला हे सांगितले होते. शरद पवारांचे राजकारण गद्दारीशिवाय आणि पाठीत खंजीर खुपसल्याशिवाय होत नाही हे पुन्हा सिद्ध झाले. सरकार मजबूत आहे. शिल्लक असलेली माणसं टिकवण्यासाठी काहींना सरकार कोसळणार अशी विधाने करावी लागतात असं त्यांनी सांगितले.
पवारांची सत्ता गेल्यानंतर लगेच आमदार पळायला लागतात
तसेच विरोधी पक्षात असताना एकही आमचा आमदार फुटत नाही. पवारांची सत्ता गेल्यानंतर लगेच आमदार पळायला लागतात. मुख्यमंत्री असणाऱ्या शिवसेनेचे ५० आमदार गेले. अडीच वर्षात आमचा एकही आमदार म्हटला नाही मला पक्ष सोडायचा आहे. आम्ही विचाराने काम करतोय. आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही दबावाखाली येऊन पक्षांतर करतोय असं म्हटलं नाही. त्यामुळे सरकार पूर्ण मजबूत आहे, काही चिंता करू नका असंही पडळकरांनी म्हटलं.
शरद पवार आणि संजय राऊत या फाटक्या आणि जीर्ण…
दरम्यान शरद पवार आणि संजय राऊत या फाटक्या आणि जीर्ण झालेल्या नोटा आहेत. चलनात न चालणाऱ्या नोटा आहेत. पवारांचा चेहरा आधीच विश्वासघाताने, गद्दारीने आणि पाठीत खंजीर खुपसण्यानं कालवंडलेला होता. मागच्या महिन्यात त्यांच्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यावर शिक्कामोर्तब केले होते. फडणवीसांनी एकच विधान केल्यानं पवारांचा कालवंडलेला चेहरा आता डांबरासारखा काळा झाला अशी टीका गोपीचंद पडळकरांनी केली आहे.