दि.१२: Google Chrome हे मोबाईल व कॉम्प्युटरवर सर्वात जास्त वापरले जाणारे ब्राउझर आहे. कुठलीही माहिती शोधण्यासाठी अनेकजण Google वर सर्च करतात. अनेकवेळा Gmail सह इतर अनेक सेवा वापरण्यासाठी लॉगिन करावे लागते. सारखे सारखे पासवर्ड व युजर आयडी टाकावा लागतो. गुगल क्रोम हे ॲटो साईन इन (auto sign in) करण्यासाठी परवानगी मागते. अनेकजण याची परवानगी देतात, यामुळे प्रत्येकवेळी लॉगिन करायची गरज लागत नाही. मात्र हे धोकादायक ठरू शकते.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, तुम्ही तुमची संवेदनशील माहिती गुगल क्रोम ब्राउझरवर सेव्ह केली असेल तर, ती हॅकिंगसाठी जबाबदार असू शकते. सुरक्षा तज्ञ कंपनी AhnLab च्या अहवालानुसार, अलीकडेच Redline Stealer मालवेअरची ओळख पटली आहे, जो Google Chrome मध्ये सेव्ह केलेला लॉगिन आयडी आणि पासवर्ड चोरतो. या मालवेअरद्वारे हॅकर्स तुमच्या वैयक्तिक आणि गोपनीय तपशीलांवर नियंत्रण ठेवतात. बँकिंग फसवणुकीसारख्या घटनाही ते घडवून आणतात. यासोबतच, वैयक्तिक माहितीच्या बदल्यात पैशांचीही मागणी करतात.
मालवेअरवर अँटीव्हायरस प्रभावी नाही
AhnLab च्या रिपोर्टनुसार, हा मालवेअर वर्क फ्रॉम होमच्या काळात समोर आला असून अतिशय धोकादायक आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या मालवेअरवर अँटीव्हायरसचाही कोणताही परिणाम होत नाही. यावरूनच मालवेअरच्या धोक्याचा अंदाज लावता येतो. मालवेअर कंपनीच्या व्हीपीएनमध्ये प्रवेश करून लॉगिन आणि पासवर्ड चोरण्याचे काम करतो . अशा परिस्थितीत, युजर्सना त्यांचा लॉगिन आयडी पासवर्ड गुगल क्रोममध्ये सेव्ह न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या मालवेअरवर अँटीव्हायरसचा कोणताही परिणाम होत नाही.
हे करा
Google Chrome ब्राउझरवर कोणताही पासवर्ड सेव्ह करू नका. वेळोवेळी पासवर्ड बदलत राहा. नेहमी सुरक्षित आणि अधिकृत वेबसाइट वापरा. मेल, मेसेज किंवा व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. महत्त्वाची माहिती, वैयक्तिक डेटा आणि इतर महत्त्वाच्या फाइल्स प्रोटेक्शन शिवाय सेव्ह करू नका.