बारामती,दि.२८: उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) बारामतीत दाखल झाल्यानंतर विमानतळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले. आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आदींसह पवार कुटुंबीयांनी अदानी यांचे स्वागत केले. अदानी बारामतीमध्ये पोहचल्यानंतर संपूर्ण पवार कुटुंब त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होतं. (Gautam Adani In Baramati)
भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अचानक बारामतीमध्ये दाखल झाले. ते विमानतळावर दाखल झाले तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. देशातील अती महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक असलेले गौतम अदानी सपत्नीक येत असल्याने बारामती विमानतळाबाहेर मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
गौतम अदानी यांनी बारामतीत शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सिलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं (AI) उद्घाटन केलं. विद्या प्रतिष्ठानअंतर्गत या अत्याधुनिक AI सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. विद्या प्रतिष्ठान ही पवार कुटुंबाकडून चालवली जाणारी शैक्षणिक संस्था आहे.
गौतम अदाणी यापूर्वी २०२२ मध्ये बारामतीत आले होते. त्यावेळी अदाणी यांनी सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटरचं उद्घाटन केलं होतं. अदाणी आणि पवार कुटुंबात दोन दशकांहून जुने संबंध आहेत. हे नवा एआय सेंटर ऑफ एक्सिलन्स क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित शिक्षण, कौशल्य विकास वाढविण्याच्या उद्देशाने स्थापित करण्यात आलं आहे.
शरद पवार मार्गदर्शक
AI सेंटर ऑफ एक्सिलन्स कार्यक्रमावेळी गौतम अदानी यांनी संबोधित केलं. ते म्हणाले, शरद पवार नेहमीच माझे मार्गदर्शक राहिले आहेत. बारामतीत सुरू करण्यात आलेलं AI केंद्र कृषी, स्वास्थ, नावीन्यपूर्ण याकडे लक्ष केंद्रीत करेल. आता AI भारताचा चौथा पाया बनणार आहे. AI भारताच्या विकास पथालाही आकार देईल असंही ते म्हणाले. एआयमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल. जागतिक AI च्या स्पर्धेत भारताने एक पाऊल पुढे टाकलं आहे. AI केवळ एक तांत्रिक बाजू राहिलेली नाही तर जागतिक वर्चस्वासाठीची स्पर्धा बनली आहे.








