भाजपा जिल्हाध्यक्षांच्या मालकीच्या जागेत जुगाराचा अड्डा, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

बीड,दि.29: बीडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या (BJP) जिल्हाध्यक्षांच्या मालकीच्या जागेत चालणाऱ्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. स्पोर्टस् क्लबच्या नावाखाली राजरोस जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. जुगार अड्ड्यावर केजचे सहायक अधीक्षक व आयपीएस पंकज कुमावत यांनी छापा टाकून 47 जणांना रंगेहाथ पकडले. (Police raid on Beed BJP President Rajendra Maske’s gambling den)

28 डिसेंबर रोजी 11 वाजता शहराजवळील तळेगाव शिवारात ही कारवाई केली. यावेळी पाऊण कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दरम्यान, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के (Beed BJP President Rajendra Maske) यांच्या जागेत हा अड्डा सुरु होता, असे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आयपीएस पंकज कुमावत यांनी यापूर्वी गुटखा प्रकरणात धडक कारवाया केल्या. बीडमधील गुटख्याच्या गोदामावर टाकलेल्या धाडीनंतर शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा नोंद केल्याने कुमावत चर्चेत आले होते. पाठोपाठ त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मालकीच्या जागेतील जुगारअड्डयाचा पर्दाफाश केला. 28 डिसेंबर रोजी रात्री 11: 10 वाजता त्यांनी चऱ्हाटा रोडवरील तळेगाव शिवारात स्पोर्टस् क्लबच्या जागेतील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी 47 जणांना तिर्रट खेळताना रंगेहाथ पकडले. रोख 1 लाख 51 हजार 940 रुपये , दोन चारचाकी, जुगार साहित्य व मोबाइल असा एकूण 75 लाख 62 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here