सोलापूर,दि.१२: शेतकऱ्याच्या अपहरणाप्रकरणी चार मुकादमांची न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली आहे. यात हकिकत अशी की, दिनांक ०९/०८/२०२३ रोजी यातील फिर्यादी व त्यांचे पती हे त्यांच्या स्वतःच्या घरी बसले असताना त्यावेळी त्यांच्या घरासमोर एक पांढऱ्या रंगाची जीप आली व त्यामधून ४ इसम हातात काटया घेवून खाली उतरले व त्या सर्वांनी मिळून फिर्यादी यांच्या पतीची गच्ची पकडून शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने मारहाण केली.
फिर्यादी यांचे पती यांना सोबत घेवून जावू लागले त्यावेळी फिर्यादी यांनी माझ्या पतीस का घेवून जात आहात असे विचारले असता त्यांनी फिर्यादीस पती व चुलत सासरा यांनी सन २०२२ साली अक्कलकोट येथे येवून कारखान्याचा उस तोडण्यासाठी येतो म्हणून ९ कोयते असे सांगून ६,००,०००/- रूपये उचल घेवून आलेले आहेत. पण अदयापपर्यंत कुठलेही कामगार पुरविलेले नाहीत. असे सांगितले त्यावेळी फिर्यादीने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी आरोपींनी फिर्यादीस ढकलून दिले.
त्यावेळी आरडाओरडा ऐकून फिर्यादीचे शेजारी सोडविण्यासाठी आले असता त्यांचे ही काही न ऐकता यातील आरोपींनी फिर्यादीचे पती यांना जबरदस्तीने जीप मध्ये बसवून घेवून गेले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीच्या सासूच्या मोबाईलवर फोन करून तुझ्या मुलाला विजापूरला घेवून जात आहे व तुझा मुलगा जेव्हा आमचे पैसे देईल तेव्हा आम्ही त्याला सोडतो. अशा आशयाची फिर्याद नळदुर्ग पोलीस स्टेशन येथे दाखल झाली होती त्याप्रमाणे यातील आरोपी यांना दि. ११/०८/२०२३ रोजी अटक करण्यात आली होती.
यातील आरोपी संजय चव्हाण, शंकर चव्हाण, दिलीप चव्हाण, अविनाश चव्हाण सर्व राहणार शिवाजी नगर लमाण तांडा, ता. अक्कलकोट यांनी जामीन मिळणेकामी अॅड. अभिजीत इटकर यांच्यामार्फत उस्मानाबाद येथील सत्र न्यायालय येथे जामीनासाठी अर्ज दाखल केला.
यात आरोपीतर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, सदर फिर्यादीचे पती हा स्वतःहून कामगारांचे घर दाखवितो म्हणून संबंधित संशयित आरोपींविरुध्द त्यांच्या कारमध्ये गेला व सदर फिर्यादीच्या पतीस कोणतीच मारहाण झालेली नसल्यामुळे त्याचे बळजबरीने अपहरण करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. त्यापोटी आरोपीच्या वकिलांनी अनेक उच्च न्यायालयाचे निवाडे दाखल केले.
सदरचा युक्तीवाद ग्राहय धरुन सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी आरोपी संजय चव्हाण, शंकर चव्हाण, दिलीप चव्हाण, अविनाश चव्हाण यांची जामीनावर मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे अॅड. अभिजीत इटकर, अॅड. दत्ता गुंड, अॅड. संतोष आवळे अॅड. फैयाज शेख, अॅड. सुमित लवटे, अॅड. शिवाजी कांबळे यांनी काम पाहिले.