जारकीहोळी कुटुंबातील चार भाऊ आमदार, देशातील राजकारणात प्रथमच असे घडले

0

बेळगाव,दि.१५: चार भाऊ आमदार बनून नवीन इतिहास घडला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. चारही भाऊ आमदार झाले आहेत. अर्थातच काँग्रेस, भाजप सर्व पक्षात भाऊ आमदार आहेत. विधान परिषदेच्या निवडणूक निकालांकडे साऱ्यांचे लक्ष लागलं होतं. यात प्रामुख्याने कर्नाटक विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना बेळगाव जिल्ह्यात भाजपाचे सर्वाधिक आमदार आहेत. येथील निवडणुकीत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता होती. यात निवडणुकीच्या निकालातून जारकीहोळी (Jarkiholi) बंधूचे राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

जारकीहोळी (Jarkiholi) कुटुंबातील ३ जण सध्या आमदार आहेत. आता लखन जारकीहोळी हे विधान परिषदेत निवडून आल्याने ते देखील आमदार झाले आहेत. २०१९ च्या विधानसभा पोटनिवडणुकीत लखन यांनी काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेत स्वत:च्या भावाविरोधात निवडणूक लढवली होती. या पोटनिवडणुकीत त्यांचे बंधू रमेश जारकीहोळी यांचा विजय झाला होता. त्यानंतर दीड वर्षांनी झालेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत हे दोघंही बंधू एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं.

२०१९ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसमधून मंत्रीपद भूषविलेले रमेश जारकीहोळी हे भाजपातर्फे गोकाकच्या रिंगणात होते. तर काँग्रेसतर्फे लखन जारकीहोळी यांनी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. रमेश, सतीश व भालचंद्र हे वेगवेगळ्या पक्षांत असले तरी एकत्र असल्याचे नेहमी जिल्ह्याने पाहिले आहे. पण पोटनिवडणुकीत मात्र रमेश व लखन या सख्ख्या भावांमध्ये लढत झाली तेव्हा रमेश जारकीहोळी यांना गड राखण्यात यश आलं होतं. जारकीहोळी बंधू एकमेकांविरोधात निवडणूक लढवत असले तरी कायम चर्चेत असतात. सध्या त्यांच्या घरात २ भाजपा, १ काँग्रेस आणि १ अपक्ष असे ४ आमदार आहेत. मूळचे गोकाकचे असलेले जारकीहोळी बंधू १९९९ पासून राजकीय प्रवासात आहेत. १९९९ मध्ये रमेश जारकीहोळी पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले होते.

लखन जारकीहोळी विधान परिषदेत आमदार म्हणून निवडून आल्याने त्यांच्या कुटुंबातील चार भाऊ सतीश, रमेश, भालचंद्र आणि लखन हे चौघंही आमदार झालेत. देशाच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे. लखन जारकीहोळी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधान परिषदेची निवडणूक लढवली होती. एकाच घरातील ४ आमदार असा योगायोग यापूर्वी कधीही घडला नाही. सतीश जारकीहोळी हे काँग्रेसचे तर रमेश आणि भालचंद्र जारकीहोळी हे भाजपाचे आमदार आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here