दूध डेअरी चालकावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी चौघांची निर्दोष मुक्तता

0

सोलापूर,दि.८: दूध डेअरी चालकावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयाने चौघांची निर्दोष मुक्तता केली आहे. यात हकिकत अशी की दिनांक २७/०२/२०१५ रोजी गुंजेगाव, ता. दक्षिण सोलापूर येथील ग्रामपंचायतीच्या ऑफिससमोर सकाळी ०८:०० वाजण्याच्या सुमारास आरोपी प्रविण शिवाजी अवताडे, अरविंद शिवाजी अवताडे, शिवाजी श्रीरंग अवताडे व रविना शिवाजी अवताडे यांनी फिर्यादी गणेश रामचंद्र हजारे यास त्यांच्या शेतातील कॅनॉलचे पाणी देण्या घेण्याच्या कारणावरून, लोखंडी सळईने डोक्यात मारून तसेच लाथाबुक्क्याने मारून खुनी हल्ला केला.

सदर हल्ल्यात सदर फिर्यादी गणेश हजारे हे गंभीर जखमी झाले व त्याप्रमाणे मंद्रुप पोलिस स्टेशन येथे वरील आरोपींविरूध्द फिर्याद देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपास पुर्ण करून, दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. यात सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. सदर ६ साक्षीदारांपैकी फिर्यादी तसेच फिर्यादी यास प्रथोमपचार केलेले वैद्यकिय अधिकारी व तपासअधिकारी यांची उलटतपासणी कलाटणी देणारी ठरली.

यात आरोपींतर्फे युक्तिवाद करतेवेळी ॲड. अभिजीत इटकर यांनी असे मुद्दे मांडले की, फिर्यादीच्या साक्षीनुसार जखमेतून प्रचंड रक्तप्रवाह वाहत होता परंतू घटनास्थळी रक्ताचे थेंब दिसून येत नाहीत. तसेच सरकार पक्षाने सदर फिर्यादीने दिलेली पहिली फिर्याद लपवून ठेवलेली असून, न्यायालयास सत्य घटनेबाबत अंधारात ठेवण्यात आलेले आहे. तसेच वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या उलट तपासणीमध्ये अनेक बाबी त्यांनी मान्य केल्या व त्याबाबींचा सखोल उहापोह केला असता, सदर सरकार पक्षाने मांडलेल्या बाबींबद्दल संशय निर्माण होतो व सदरची केस ही खऱ्या स्वरूपात न्यायालयासमोर मांडण्यात आली आहे असे म्हणता येणार नाही.

सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्हि. बी. चव्हाण यांनी सदर चारीही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यात आरोपीतर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. राम शिंदे, ॲड. दादासाहेब जाधव, ॲड. बंडू सटाले, ॲड. युवराज अवताडे, ॲड. जयराम उटगीकर यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here