सोलापूर,दि.19: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांचं गुजराती समाजाबाबत केलेले वक्तव्य चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला येणारा वेंदाता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला, यावरून सध्या राजकारण तापलं आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मी मुख्यमंत्री असताना गुजराती समाजाला 2 टक्के आरक्षण दिलं, एवढं एक चांगलं काम मी गुजराती समजाकरता केलं होतं, असं ते म्हणाले. सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
“सुशीलकुमार शिंदेंनी दोन टक्के आरक्षण दिलं होतं ते आता लोक विसरून गेलेत. माझा जावईच गुजराती असल्यामुळे मला ते करावं लागलं होतं. जावयाला सांभाळायचं म्हणजे सगळं करावं लागतं,” असं सुशीलकुमार शिंदे हसत मिश्किलपणे म्हणाले. त्यावेळची परिस्थितीही तशीच होती. हे सर्व केल्यामुळे मी त्यावेळची निवडणूक जिंकूनही आलो, असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी बोलताना स्वपक्षीयांवर निशाणा साधला. “कसं मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावरून काढलं आणि राज्यपाल म्हणून आंध्र प्रदेशला पाठवलं हे कारस्थान या लोकांना माहितीये. परंतु ज्यांनी पाठवलं, मी दिल्लीच्या मंत्रिमंडळात पुन्हा गेलो, पण त्यांना जो पराभव पत्करावा लागला तो अद्यापही आहे. आपण आपलं काम प्रामाणिकपणे करायला पाहिजे,” असंही शिंदे यांनी नमूद केलं.