सोलापूर,दि.२२: अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची पावणेपाच लाखांची फसवणूक केल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल असलेले महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांना विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली.
महामंडळाच्या निधीचा अपहार… | Ramesh Kadam
रमेश कदम यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून महामंडळाच्या निधीचा अपहार करण्याच्या हेतूने त्यांची आजी वायमा गणपत क्षीरसागर (रा.नांदणी, ता. बार्शी) यांच्या नावाने दुग्ध व्यवसायाचे कर्ज मंजुरीचे बेकायदेशीर आदेश तयार करून कर्ज मंजूर केले आहे, असे खोटे भासवून ते खरे म्हणून वापर करुन सदरचे आदेश देऊन महामंडळाचे कर्मचारी लक्ष्मण कांबळे व इतरांवर दबाव टाकला व ४ लाख ७५ हजारांचा धनादेश दिला, त्यावरून महामंडळाची व सरकारची फसवणूक केल्याची फिर्याद कर्मचारी अनिल राघोवा म्हस्के यांनी ३१ मे २०१७ रोजी सदर बझार पोलीस ठाण्यात दिली होती.
अन्य एका गुन्हयात ठाणे मध्यवर्ती कारागृहात असलेल्या रमेश कदम यांना तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे व शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन मंगळवारी येथील न्यायालयासमोर हजर केले असता, पोलिसांनी तपासासाठी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली.
तर माजी आमदार कदम यांच्या वकिलांनी, ही घटना २०१४ मधील असून फिर्याद २०१७ मध्ये दाखल झाली आहे आणि आरोपीस पोलिसांनी जवळपास सहा वर्षांनी न्यायालयासमोर हजर केले असल्यावावतचा युक्तिवाद केला, त्यावर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पांढरे यांनी २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली.
यात आरोपीतर्फे ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. विनोद सूर्यवंशी यांनी तर सरकारतर्फे ॲड. अल्पना कुलकर्णी यांनी काम पाहिले.