मोहोळ,दि.२: लोकप्रतिनिधी माजी झाल्यावर जनता विसरून जाते, मात्र मी काय केलेल्या कामाची जाणीव ठेवत मोहोळ विधानसभा मतदारसंघातील गावागावातील जनतेने माझे उत्स्फूर्त केलेले स्वागत पाहून जनता मला अजूनही विसरलेली नाही हे दिसून आले असून तालुक्यातील अनेक मूलभूत प्रश्न सुटलेले नसल्याच्या समस्या नागरिकांनी मांडल्या असून त्या सोडवून “मागेल त्याला पाणी” सह सर्व योजना सुरू करून “घंटो का काम मिंटोमे” ही नवीन संकल्पना घेऊन मी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनतेसमोर जाणार असल्याचे मत माजी आमदार रमेश कदम यांनी व्यक्त केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील कथित भ्रष्टाचार प्रकरणी आठ वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर दरम्यान मोहोळ विधानसभा मतदारसंघातील अनेक गावात माजी आमदार रमेश कदम यांनी भेट देत जनतेशी संवाद साधला. याप्रकरणी आयोजित केलेल्या रमेश कदम यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडताना म्हणाले की, मोहोळ मतदार संघातील जनता प्रामाणिक असून जो त्यांच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करेल त्यांच्यावर ती भरभरून प्रेम करते. सत्तेपासून दूर गेलेल्या नेत्याला जनता विसरते मात्र मी आमदार असताना सात ते आठ महिने केलेल्या कामाची जाणीव ठेवत मोहोळ मतदार संघातील जनतेने मला भरभरून प्रतिसाद दिला असून येणाऱ्या काळामध्ये सोबत आलेल्या तरुणांना घेऊन प्रलंबित असलेली सर्व मोठी कामे हाती त्याचा प्रयत्न करणार असल्याचे ही कदम यांनी यावेळी सांगितले.
मोहोळ मतदार संघाचा चौफेर विकास होणे अपेक्षित आहे, मात्र काही भागावर विकास निधीच्या बाबत अन्याय झाल्याची जनतेची भावना असून वंचित भागाचाही बॅकलॉग भरून काढणे आवश्यक आहे. जनतेशी चर्चा करून लवकरच राजकीय भूमिका घेऊन त्याद्वारे रखडलेला विकास हाच केंद्रबिंदू मानून काम करणार असल्याचे सांगून ज्येष्ठ नेते मनोहर डोंगरे, बळीराम काका साठे, रमेश बारसकर यांच्यासह अनेक पक्षातील नेत्यांनी माझी भेट घेत तुम्ही आमच्या पक्षात या, आम्ही विधानसभेसाठी जागा सोडण्यासाठी पक्षाला विनंती करू, असे म्हणाले. मात्र मी राजकीय भूमिका घ्यायची तेव्हा घेईन.
मात्र माझ्या राजकीय जीवनात या वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन उपयोगी येईल, असेही रमेश कदम यांनी सांगितले. पंढरपूर विभागातील १७ गावातील रस्ते अत्यंत खराब झाले असून “आधी रस्ते मग वाळू” या भूमिकेवर मी अजूनही ठाम असून यासह तिऱ्हेमार्गे पंढरपूर आणि छोट्या मोठ्या गावातील रस्ते यासाठी आंदोलन करावे लागले तर ते मी करणार आहे.
तालुक्यातील विकास कामांना विरोध केव्हाच करणार नाही, मात्र तालुक्यात रस्त्यांची दुरावस्था असून रस्त्यांच्या निधीसाठी आगामी काळात प्रयत्न करणार आहे. तर माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे सोबत मी यापूर्वी काम केले आहे, मात्र काही गैरसमजती मधून काही गोष्टी घडल्या, मात्र या गोष्टी आम्ही प्रामाणिकपणे मान्य करीत आगामी काळात एकमेकांना डिस्टर्ब न करता एकमेकांना कशी मदत करता येईल, असे काम करण्याची अपेक्षा दोघांनीही एकमेकांकडून ठेवली आहे. हे राजकीय मनोमिलन असे म्हणता येणार नाही, मात्र आम्ही कुठेही असलो तरी एकमेकांचे नुकसान होणार नाही, ही भूमिका घेण्याबाबत आमच्या दोघांचे एकमत झाले असल्याचेही यावेळी रमेश कदम यांनी स्पष्ट केले.
यासह मी भविष्यात जिथे आक्रमक व्हायचे तिथे होणार असून मात्र संयमाने काही भूमिका सुटत असतील तर आक्रमक होण्याची गरज वाटत नाही प्रशासनाशी ही विनाकारण संघर्ष न करता समन्वय साधून यापुढे काम करणार आहे. आणि प्रकृतीच्या कारणावरून नरखेड येथील उमेश पाटील यांचा कार्यक्रम रद्द झाला असला तरी तो कायमचा रद्द झाला नसून येणाऱ्या काळात प्राधान्याने तिथे कार्यक्रम घेणार असल्याचेही शेवटी रमेश कदम यांनी सांगितले.