सोलापूर,दि.२९: माजी आमदार दिलीप माने (Former MLA Dilip Mane) यांच्या पक्षप्रवेशाला भाजपा कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. घोटाळ्यात अडकलेल्या आणि जनतेची फसवणूक केलेल्या नेत्यांच्या भाजपा प्रवेशाला विरोध करण्यासाठी भाजपाच्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन सोलापूर भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी स्वीकारले. कार्यकर्त्यांच्या भावना प्रदेशाकडे पोहोचवू असा शब्द दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते.
भाजपा सोलापूर दक्षिणच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मुंबईत भेट घेतली. भाजपमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, कार्यकर्त्यांच्या भावनाची दखल घेतली जाईल असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी दिले.
माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाचा वाद आता थेट मुंबईपर्यंत पोहोचला आहे. शहरातील भाजप कार्यालयासमोर धरणे आंदोलन आणि घोषणाबाजी झाल्यानंतर मंगळवारी दक्षिण सोलापूर मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी थेट मुंबईत दाखल झाले.
त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची भेट घेऊन आपली नाराजी त्यांच्या समोर मांडली. दिलीप माने यांच्या संभाव्य पक्ष प्रवेशाला तीव्र विरोध व्यक्त करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकीट वाटपात आमच्यावर अन्याय होऊ नये, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी प्रदेश नेतृत्वासमोर केली.
भाजपच्या कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही असे आश्वासन यावेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी दिले या शिष्टमंडळात हनुमंत कुलकर्णी, विशाल गायकवाड, शिवराज सरतापे, संगाप्पा केरके, महेश देवकर, अर्जुन जाधव, अतुल गायकवाड, प्रशांत कडते, यतीन शहा, सचिन पाटील आदींचा समावेश होता.








