माजी मंत्र्याचा ठाकरे गट शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

0

मुंबई,दि.20: भाजपाच्या माजी मंत्र्याने ठाकरे गट शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाणे पसंद केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर शिवसेनेचे 40 आमदार व 12 खासदार गेले आहेत. एकनाथ शिंदे गटात अनेकांनी प्रवेश केला आहे. त्याच बरोबर शिवसेनेतही (उध्दव बाळासाहेब ठाकरे) अनेकजण प्रवेश करत आहेत. पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठीउद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी खेळली आहे. संजय राठोड यांच्या मतदार संघातील माजी राज्यमंत्री आणि भाजप नेते संजय देशमुख (Sanjay Deshmukh)यांचा आज मातोश्रीवर शिवबंधन बांधून पक्षप्रवेश झाला आहे. 

डिग्रसचे माजी आमदार संजय देशमुख यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेते प्रवेश केला. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय देशमुख यांना शिवबंधन बांधले. शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत मागील महिन्यात अकोला येथे आले असता देशमुख यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली होती. तेव्हापासूनच देशमुख हे उद्धव ठाकरे यांची मशाल हाती घेण्याची शक्यता वर्तविली जात होती.

दिग्रसमध्ये संजय राठोड आणि संजय देशमुख मोठे नेते आहेत. संजय देशमुखांना मात दिल्यामुळे सध्या मतदारसंघात संजय राठोड यांचे दिग्रस वर्चस्व आहे. आता संजय देशमुख शिवसेनेत आल्यामुळे दिग्रस मतदारसंघात राठोड विरुद्ध देशमुख अशी लढत पाहायला मिळणार आहे. संजय राठोड यांना आव्हान देण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.

संजय देशमुख आणि संजय राठोड यांची सुरुवात शिवसेनेतूनच झाली. पण, कालांतराने दोघे वेगवेगळ्या पक्षात गेले. देशमुख यांनी 1999 ते 2009 असे दहा वर्षे दिग्रस मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. दिग्रसमधील स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यांची मजबूत पकड आहे. 1999 मध्ये शिवसेनेत असताना विधानसभेची उमेदवारी नाकारल्याने देशमुख हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते. त्यावेळी त्यांनी 125 मतांनी राष्ट्रवादीच्या ख्वाजा बेग यांचा पराभव करून विधिमंडळात प्रवेश केला.

त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. मात्र भाजप-सेना युतीत तिकीट न मिळाल्याने त्यांनी संजय राठोड यांच्याविरोधात अपक्ष म्हणून बंडखोरी केली. त्यावेळी त्यांना 75 हजारांवर मते मिळाली होती. मतदारसंघातील विविध संस्थांवर देशमुख यांचे वर्चस्व असल्याने त्यांच्या प्रवेशानंतर मतदारसंघातील गणिते बदलण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here