Ganesh Naik: माजी मंत्री गणेश नाईकांविरोधात महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचे आरोप

0

मुंबई,दि.१३: माजी मंत्री गणेश नाईकांविरोधात (Ganesh Naik) महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचे आरोप करण्यात आला आहे. माजी मंत्री व ऐरोली विधानसभेतील भाजपाचे आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आलेत. सन १९९३ पासून गणेश नाईक यांनी एका महिलेला लग्नाचे आमिष देवून व जीवे मारण्याची धमकी देवून तिचे लैंगिक शोषण करीत असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला असून यासंदर्भातील माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दिली आहे.

गणेश नाईक यांच्या आमिषाला व त्यांनी दिलेल्या धमकीमुळे सदर महिला त्यांच्यासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत आहे. सदर संबंधातून त्यांना पंधरा वर्षाचा मुलगा आहे. जेव्हा जेव्हा पीडित महिला गणेश नाईक यांच्याकडे लग्न करण्याची मागणी करत असे त्या त्या वेळी गणेश नाईक हे त्यांना जीवे मारण्याची धमकी द्यायचे असे पीडित महिलेने म्हटलं आहे. पीडितेने त्यांचे वैवाहिक अधिकार तसेच त्यांच्या मुलाकरता पितृत्वाचा अधिकार मागितला असता गणेश नाईक यांनी पीडितेला तिच्या मुलासाह जीवे मारण्याची धमकी देत असल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे करण्यात आलीय.

गणेश नाईक यांचा मुलगा संदीप नाईक देखील सदर महिलेला त्यांच्यासोबत असलेले संबंध संपवून इतरत्र निघून जावे याकरिता जीवे मारण्याच्या धमक्या देत होता, असा आरोप करण्यात आलाय. नेरूळ पोलीस स्थानकात याबाबत लेखी तक्रार देवूनही पोलिसांकडून कार्यवाही होत नाही. यामुळे गणेश नाईक यांचे विरुध्द भारतीय दंड विधान ३७६, ४२०, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंद करावा आणि त्यांना पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे असा विनंती अर्ज त्यांनी राज्य महिला आयोगाला केला आहे.

प्राप्त तक्रार गंभीर स्वरूपाची असल्याने राज्य महिला आयोगाने त्याची दखल घेवून ४८ तासांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश नवी मुंबई पोलिसांना दिले आहेत. यासंदर्भातील माहिती महिला आयोगाच्या ट्विटर हॅण्डलवरुन या पत्रासहीत पोस्ट करण्यात आलीय. बेलापूर पोलीस आयुक्तांना यासंदर्भातील कारवाईचे निर्देश देण्यात आलेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here