या कारणामुळेच भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला?

0

दि.२: भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देऊन सर्वांना धक्का दिला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या व विधान परिषदेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने विजय संपादन केला होता.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा राज्यातील राजकारणामध्ये जातीय समिकरणांचा विचार करुन घेण्यात आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. असं असतानाच भाजपामधील काही नेत्यांनी विरोध केल्याने आणि पुन्हा ब्राह्मण मुख्यमंत्री न करता मराठा सामजातील मुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा जातीय समीकरणांचे कारण देत भाजपा पक्षश्रेष्ठींनी घेतल्याची माहितीही समोर आलीय. याच कारणामुळे फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदी नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा आहे.

राज्याच्या राजकारणामध्ये याच साऱ्या चर्चा सुरु असतानाच आता एकेकाळी काँग्रेसला अशाच प्रकार खिंडार लावणारे मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही एकनाथ शिंदे मराठा असल्याचा उल्लेख करत एक महत्वाचं विधान केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील ट्विट केलंय.

सध्या केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री असणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना महाविकास आघाडीवर टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्राचा विकास थांबला होता तो आता फडणवीस आणि शिंदे जोडी पुन्हा सुरु करेल असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला. यावेळेस बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे मराठा असल्याचही आवर्जून उल्लेख केला. “मागील अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या विकासाला महाविकास आघाडीच्या अपवित्र आघाडीमुळे खिळ बसली होती. अशावेळी मराठा म्हणून एकनाथ शिंदेंनी विचारसणीच्या दृष्टीकोनातून योग्य निर्णय घेतला. मला विश्वास आहे की ‘फडणवीस-शिंदे जोडी’ पुन्हा महाराष्ट्रात विकास सुरु करतील,” असं ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.

ज्योतिरादित्य शिंदेंनीही एकनाथ शिंदेंप्रमाणेच आपल्या पक्षाविरोधात बंडखोरी केली होती. मार्च २०२० मध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडखोरी करत काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळेस शिंदेंसोबतचे समर्थक आमदारही पक्षातून बाहेर पडल्याने मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकार पडलं होतं. शिंदे गटाच्या समर्थनावर शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री झाले होते. मात्र यावेळी शिंदेंनी राज्य सरकारमध्ये कोणतंही पद घेतलं नव्हतं. अर्थात नंतर त्यांना भाजपाने राज्यसभेची खासदारकी आणि केंद्रीय मंत्रीपद दिलं.

ब्राम्हण मुख्यमंत्री पुन्हा करू नये

फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्यास भाजपामधील काही ज्येष्ठ नेत्यांचा विरोध होता. त्यामुळे ब्राह्मण मुख्यमंत्री पुन्हा करू नये, असे मत काही नेत्यांनी अमित शहा यांच्याकडे व्यक्त केले होते. शिंदे हे मराठा समाजातील आहेत. शरद पवार यांनी फडणवीस हे ब्राह्मण समाजातील असल्याने काही वक्तव्ये केली होती. तर शिंदे हे शिवसेनेतून बाहेर का पडले, भाजपा शिंदे यांना मुख्यमंत्री करणार असेल, तर आनंदच आहे, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यामुळे जातीय समीकरणांचे कारण देत फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा पत्ता कापला गेला.

भाजपामध्ये ब्राह्मण नेतृत्वाचं खच्चीकरण

भाजपामध्ये एकानंतर एक ब्राह्मण नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचे एक सुनियोजित कारस्थान चाललं आहे, असा गंभीर आरोप ब्राम्हण महासंघाने केला आहे. डॉ. गोविंद कुलकर्णी म्हणाले, “भाजपामध्ये ब्राह्मणांचे खच्चीकरण होत आहे. पंतप्रधान पदाच्या स्पर्धामधून हटवण्यासाठी नितीन गडकरी यांचं चारित्र्य हनन करून त्यांचं खच्चीकरण करण्यात आलं. त्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून भाजपातील तथाकथित नेते मंडळी देवेंद्र फडणवीस यांची घोडदौड रोखण्यासाठी बहुमतापेक्षा अधिक संख्येने युतीचे आमदार निवडून आणल्यानंतरही सरकार न बनविण्याचं षडयंत्र आखण्यात आलं. योजनाबद्ध पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून लांब ठेवण्यात आले.”

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेले ३९ आमदार किती काळ त्यांच्याबरोबर राहतील, ते ठाकरे यांच्याबरोबर पुन्हा जातील का, याची खात्री भाजपा श्रेष्ठींना वाटत नाही. शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यावर त्यातून वेगळा संदेश जाईल आणि ठाकरे यांच्याबरोबर असलेले आमदार शिंदे खेचून आणतील. उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दगाफटका केल्याने त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना संपविण्यासाठी शिंदे यांना मुख्यमंत्रीपद द्यावे. गेल्या अडीच वर्षांतील महाविकास सरकारच्या कारभारामुळे अडचणीत आलेल्या राज्य सरकारला सावरण्यासाठी दोन-तीन वर्षे लागतील. त्यामुळे सध्या मुख्यमंत्रीपद हाती घेण्यापेक्षा दीर्घकालीन फायदा गृहीत धरून आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला शिंदे यांच्या गटामुळे मिळणारा राजकीय लाभ लक्षात घेऊन शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले, असे भाजपामधील सूत्रांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here