Nagraj Manjule: मित्राच्या पीएचडी मौखिक परीक्षेसाठी नागराज मंजुळे यांची विद्यापीठात हजेरी!

Nagraj Manjule: नागराज मंजुळे यांनी कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्यासोबत साधला संवाद!

0

सोलापूर,दि.21: सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी सोमवारी आपल्या मित्राच्या पीएचडीच्या खुल्या मौखिक परीक्षेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात हजेरी लावली. यावेळी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.

नागराज मंजुळे यांचे मित्र विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभुर्णी येथील प्रा. संजय साठे यांच्या पीएचडीची खुली मौखिक परीक्षा सोमवारी दुपारी होती. प्रा. साठे यांनी सैराट चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारलेली आहे.

ते मंजुळे यांचे गाववाले मित्र आहेत. प्रा. साठे यांनी प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी पूर्ण केली आहे. सोमवारी त्याची अंतिम खुली मौखिक परीक्षा होती. त्यासाठी खास नागराज मंजुळे हे उपस्थित राहिले.

परीक्षा सुरू होण्यापूर्वी नागराज मंजुळे यांनी कुलगुरू दालनात येऊन डॉ. मृणालिनी फडणवीस यांची भेट घेऊन मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी कुलसचिव योगिनी घारे यांच्यासह डॉ. महेंद्र कदम, डॉ. केदारनाथ काळवणे, प्रा. साठे, डॉ. मलिक रोकडे, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. दत्ता घोलप आदी उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी भविष्यात चित्रपट निर्मिती या विषयावर कार्यशाळा घेऊ तसेच त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शन करण्यास मला आवडेल, असे यावेळी बोलताना नागराज मंजुळे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विद्यापीठ परिसराची पाहणी केली. तसेच मास कम्युनिकेशन विभागाला भेट देऊन टीव्ही व रेडिओ स्टुडिओची पाहणी करून आनंद व्यक्त केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here