दि.27: FIR: यूट्यूबवर बॉलीवूड (YouTube) चित्रपटाच्या कॉपीराइट (Copyright Violation) उल्लंघनाच्या आरोपाखाली तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज गुगल (Google), त्याचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) आणि कंपनीच्या इतर पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशावरून कथित कॉपीराइट उल्लंघनाचा (Copyright Violation) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते सुनील दर्शन यांनी सांगितले की, मी माझ्या ‘एक हसीना थी, एक दिवाना था’ या चित्रपटाचे हक्क कोणाला दिलेले नाहीत किंवा तो यूट्यूबवर रिलीज केला नाही. मात्र, हा चित्रपट यूट्यूबवर असून त्याला लाखो व्ह्यूज आहेत.
हा कंटेट विनापरवाना वापरण्यात आले आणि त्याचा चित्रपट बेकायदेशीरपणे अपलोड करून मोठी रक्कम उभी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
दर्शन म्हणाले, “मी सुंदर पिचाई यांना जबाबदार धरतो कारण ते गुगलचे नेतृत्व करतात. मी माझ्या ‘एक हसीना थी एक दीवाना था’ चित्रपटाचे 1 अब्जाहून अधिक व्ह्यूज ट्रॅक केले आहेत. कंपनीकडे ही चिंता व्यक्त करण्यात आली असे असूनही, कोणतीही कारवाई झाली नाही.”
पिचाई यांच्यासह यूट्यूबचे प्रमुख गौतम आनंद, तक्रार निवारण अधिकारी जो गियर यांच्यासह 6 गुगल कर्मचाऱ्यांची नावे एफआयआरमध्ये नोंदवण्यात आली आहेत.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, गुगलने यावर सांगितले की, त्यांनी कॉपीराइट मालकांसाठी एक प्रणाली तयार केली आहे ज्याचा वापर ते YouTube सारख्या प्लॅटफॉर्मवर त्यांच्या सामग्रीचे संरक्षण करण्यासाठी करू शकतात. भारतातील Google प्रवक्त्याने सांगितले की ते अनधिकृत अपलोडची तक्रार करण्यासाठी आणि त्यांना अधिकार व्यवस्थापन साधने ऑफर करण्यासाठी कॉपीराइट मालकांवर अवलंबून आहे. ते म्हणाले की कॉपीराइट उल्लंघनाची सूचना मिळाल्यावर, ते सामग्री तात्काळ काढून टाकतात आणि एकापेक्षा जास्त वेळा उल्लंघन करणार्यांची खाती बंद करतात.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, न्यायालयाच्या आदेशानुसार उपनगरीय अंधेरी येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते सुनील दर्शन यांनी गुगल आणि त्याच्या उच्च अधिकार्यांवर कथित कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप करून गुन्हा नोंदवण्याची विनंती न्यायालयाला केली होती.