भाजपा काँग्रेस उमेदवारासह राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल

0

मुंबई,दि.२७: भाजपा काँग्रेस उमेदवारासह राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतीच चिंचवड व कसबा पोटनिवडणूक झाली. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाती पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासह काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे यांच्याविरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारीची दखल घेत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी कारवाई सुरू केली आहे.

भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा अदखलपात्र गुन्हा विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

मतदानाच्या दिवशी रविवारी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने हे मतदान केंद्रात भाजपाचे चिन्ह असलेली उपरणे गळ्यात घालून गेले होते. उपरणे घालूनच त्यांनी मतदान केले. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे यांनी निवडणूक निरीक्षकांकडे तक्रार केली होती. मतदान केंद्राच्या १०० मीटर आत कोणतेही पक्ष चिन्ह घेऊन त्यांचा मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कृती करण्यास मज्जाव आहे. त्याचे उल्लंघन केल्याने हेमंत रासने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवडणूक प्रचार संपल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप पैसे वाटप करीत असल्याचा आरोप करुन उपोषण केले होते. त्यातून आचारसंहिता भंग केल्याने त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे यांनी मतदान यंत्राचा फोटो व्हायरल करुन मतदान गोपनीयतेचा भंग केल्याने त्याबाबत तक्रार करण्यात आली होती.

याबाबत कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्रेहा विसवे यांनी सांगितले की, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपाचे उमेदवार हेमंत रासने आणि राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांनी आचारसंहितेचा भंग केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यांची दखल घेऊन कारवाई करण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here