सोलापूर,दि.23: प्रधानमंत्री पीक विमा योजना 2021-22 मधील तरतुदीनुसार खरीप हंगामातील काढणीपश्चात नुकसान भरपाई या जोखमेंतर्गत सहभागी असलेल्या शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती 72 तासांच्या आत संबंधित विमा कंपनी, कृषी विभाग यांना देणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.
सध्या जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडत असून शेतकऱ्यांनी चक्रीवादळ, वादळी पाऊस व अवेळी पाऊस यामुळे कापणीनंतर शेतात वाळविण्याकरीता ठेवलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास त्वरित विमा कंपनी, कृषी विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.
शेतात पीक कापणी करुन सुकविण्यासाठी ठेवलेल्या पिकांचे कापणीपासून जास्तीत जास्त 14 दिवस विमा संरक्षण प्राप्त आहे. या कालावधीत शेतामध्ये सुकवण्यासाठी ठेवलेल्या पिकांचे अतिवृष्टी, गारपीट, चक्रवादळामुळे नुकसान झाल्यास पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची पूर्वसूचना 72 तासाच्या आत देणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे ॲप, इन्शुरन्स कंपनीचे कंपनीचे ई-मेल-customer.service@bhartiaxa.com, इन्शुरन्स कंपनीचा टोल फ्री क्रमांक-1800-103-7712, इन्शुरन्स कंपनीचे तालुकास्तरीय/जिल्हास्तरीय कार्यालय, संबंधित बँकेची शाखा, तालुका कृषि अधिकारी कार्यालय याठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन शिंदे यांनी केले आहे.