सोलापूर,दि.31: Setu Suvidha Center: सोलापूर शहर व जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) चालविण्याकामी देण्यात आलेली ठेक्याची मुदत दि. 31 मार्च 2023 रोजी संपुष्टात आली आहे. जिल्हा सेतू समिती, सोलापूर यांच्यामार्फत सोलापूर शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात आपले सरकार सेवा केंद्र (महा ई सेवा केंद्र) स्थापन करण्यात आलेली आहेत. ते सध्या कार्यरत आहेत. तरी यापुढे नागरिकांनी आपल्या रहिवाशी भागात कार्यरत असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र (महा ई सेवा केंद्र) मार्फत विविध दाखले व सेवा सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. (Expiration of Setu Suvidha Center contract)
पत्रकात म्हटले आहे, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स कृती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात नागरिकांना विविध शासकीय, निमशासकीय दाखले / सेवा आपले सरकार सेवा केंद्रामार्फत ऑनलाईन स्वरूपात त्यांच्या रहिवाशी भागात उपलब्ध करून देणेबाबत निर्देश प्राप्त आहेत. तसेच राज्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 लागू झाला आहे. तथापि सदर अधिनियमांतर्गत विविध शासकीय / निमशासकीय विभागाने अधिसूचित केलेले दाखले / सेवा आपले सरकार सेवा केंद्रामार्फत ऑनलाईन स्वरूपात देण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत.
सेतू सुविधा केंद्र बंद करण्यात येत आहे | Setu Suvidha Center
सोलापूर शहर व जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) चालविण्याकामी देण्यात आलेली ठेक्याची मुदत दि. 31 मार्च 2023 रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील व 09 तहसिल कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) दि. 01 एप्रिल, 2023 रोजी पासून बंद करण्यात येत आहेत.
जिल्हा सेतू समिती, सोलापूर यांचे मार्फत सोलापूर शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात आपले सरकार सेवा केंद्र महा ई सेवा केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत. ते सध्या कार्यरत आहेत. तरी यापुढे नागरिकांनी आपल्या रहिवाशी भागात कार्यरत असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र (महा ई सेवा केंद्र) मार्फत विविध दाखले व सेवा सुविधांचा लाभ घ्यावा. सोलापूर शहर व जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आपले सरकार सेवा केंद्राची यादी सोलापूर जिल्ह्याच्या संकेतस्थळावर http://solapur.gov.in वर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई यांनी विकसित केलेल्या संकेतस्थळावर http://aaplesarkar.mahaonline.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नागरिक महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्या, मुंबई यांचेकडून विविध विभागांचे विविध दाखले व विविध सेवा देण्याकामी महामंडळाकडून विकसित करण्यात आलेल्या संकेतस्थळावर http://aaplesarkar.mahaonline.gov.in वर स्वयंनोंदणी करून सेवांचा लाभ घेऊ शकतात अथवा महामंडळाकडून विकसित करण्यात आलेल्या मोबाईल ॲप rts maharashtra व्दारे देखील नोंदणी करून सेवा घेऊ शकतात. आपले सरकार सेवा केंद्र व केंद्र चालक, विविध दाखले / सेवा बाबत काही तक्रार असल्यास संबंधित तहसिल कार्यालय / उपविभागीय अधिकारी कार्यालय / जिल्हाधिकारी कार्यालय (सेतू संकलन) यांचेशी संपर्क साधावा.