धाराशिवच्या माजी नगराध्यक्षाची निर्दोष मुक्तता

0

सोलापूर,दि.३१: धाराशिवच्या माजी नगराध्यक्षाची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की व शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपी अमित दिलीपराव शिंदे रा. तांबरी विभाग, जि धाराशिव याची जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी निर्दोष मुक्तता केली.

यात हकीकत अशी कि दि २३/०३/२०१२ रोजी धाराशिव पोलीस स्टेशन येथील गुन्ह्यातील आरोपी अमित दिलीपराव शिंदे यास यशोधरा हॉस्पिटल, सोलापूर येथे उपचारासाठी आणण्यात आलेले होते व त्याच्यावर लक्ष ठेवणेकामी फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल शंकर चव्हाण रा अष्ट कासार, ता. लोहारा, जि धाराशिव यांना ड्युटी नेमून दिलेली होती. त्यावेळी फिर्यादी ड्युटीवर असताना यातील आरोपी अमित दिलीपराव शिंदे हा यशोधरा हॉस्पिटल, सोलापूर येथील चहा कँटीनमध्ये चहा पिऊन निघून जात असल्याचे दिसल्याने यातील फिर्यादीने आरोपी अमित दिलीपराव शिंदे यास कोठे चालला म्हणून विचारणा केली असता, आरोपी अमित शिंदे याने फिर्यादीस तुला काय करायचे आहे बे असे म्हणून धक्काबुक्की व शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा केला म्हणून यातील आरोपी अमित दिलीपराव शिंदे याच्याविरुद्ध जेल रोड पोलीस स्टेशन येथे फिर्यादीने गुन्हा दाखल केला होता. सदर कामी पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

सदर खटल्याच्या सुनावणीवेळी सरकार पक्षातर्फे एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी महत्वाचे साक्षीदार म्हणजे फिर्यादी व सदर केस चे तपासाधिकारी हे होते. सदर खटल्याच्या सुनावणीवेळी आरोपी पक्षातर्फे अनेक सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यांचा आधार घेण्यात आला तसेच फिर्यादी व तपास अधिकारी यांची आरोपीचे वकिल अॅड. अभिजित इटकर यांनी घेतलेली उलटतपासणी खटल्यास कलाटणी देणारी ठरली.

आरोपीतर्फे अनेक महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले ते असे कि फिर्यादी हा त्याच्या पोलीस स्टेशनची हद्द सोडून कुटल्या कर्तव्यास जाणार असेल तर त्याची नोंद पोलीस स्टेशन च्या स्टेशन डायरी ला घेणे क्रमप्राप्त होते पण तशी कुठलीच नोंद दिसून येत नाही तसेच एका पोलीस अधिकाऱ्याकडून फिर्याद देण्यास घटना घडल्यानंतर ५ तास उशीर होणे हे पटण्याजोगे नाही. तसेच सदर आरोपी अमित शिंदे यास प्रथमतः सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केल्याची कुठलीच नोंद किंवा कागदपत्रे कोर्टासमोर दाखल केलेली नाहीत.

सदर बाबींचा विचार करून मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी सदर आरोपीची निर्दोष मुक्तता केली. यात आरोपीतर्फे अॅड. अभिजित इटकर, अँड. राम शिंदे, अॅड. संतोष आवळे, अॅड. फैयाज शेख, अॅड. सुमित लवटे, अॅड. शिवाजी कांबळे यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here