बसवेश्वर बेडगे/सोलापूर,दि.३ ईव्हीएम मशीनवरील आणि व्हीव्हीपॅटची मतांची आकडेवारी जुळते का हे तपासून बघितली जाते का? तर नाही. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपने बाजी मारली. 132 जागांवर भाजपने विजय मिळवला. तर महायुतीला 230 जागा मिळाल्या आहेत. या निकालानंतर अनेकांनी ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. यानंतर अनेक उमेदवारांनी ईव्हीएम मशीनची पडताळणी करण्याची मागणी केली.
विधानसभेचा निकाल लागल्यानंतर सात दिवसांच्या आत (निकालाचा दिवस धरून) प्रशासनाकडे रीतसर अर्ज व चलन भरणे आवश्यक असते. यानंतर याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला व ईव्हीएम मशीन उत्पादन करणाऱ्या कंपनीला दिली जाते. दाखल झालेल्या अर्जावर 45 दिवसानंतर कार्यवाही केली जाणार जाते. मात्र उमेदवारांनी आक्षेप घेतल्यानंतर प्रत्यक्षात ईव्हीएम मशीनवर झालेले मतदान आणि व्हीव्हीपॅटवरील (VVPAT) आकडेवारी जुळते का हे तपासून पाहिले जात नाही.
45 दिवसांचा कालावधी हा निवडणूक याचिका दाखल करण्यासाठीचा अपील कालावधी आहे. या कालावधीत जर याचिका दाखल झाली तर न्यायालयाच्या आदेशानंतर ईव्हीएमची पडताळणी होणार होते. निवडणूक याचिका दाखल न झाल्यास 45 दिवसानंतर ईव्हीएम उत्पादक कंपनीच्या अभियंत्यांना बोलावून त्यांच्याकडून आक्षेप घेण्यात आलेल्या मशिनचे मॉकपोल (चाचणी मतदान) केले जाणार जाते. जर निवडणुकीत झालेले मतदान आणि व्हीव्हीपॅटवरील (VVPAT) आकडेवारी जुळते का? हे जर तपासायचे असेल तर न्यायालयाने आदेश द्यावा लागेल.
मात्र पराभूत उमेदवारांनी ज्या ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला आहे. त्या मशीनची पडताळणी केली जाते. त्या मशीनवर झालेल्या मतदानाची आणि व्हीव्हीपॅटवरील (VVPAT) आकडेवारी जुळते का? हे तपासले जात नाही. विजयी उमेदारानंतरच्या दोन व तीन नंबरवर असणाराच उमेदवार ईव्हीएम व्हेरिफिकेशनची मागणी करू शकतात. जास्तीत जास्त 5% मशीनची पडताळणी केली जाते. समजा एखाद्या विधानसभा मतदारसंघात 300 ईव्हीएम मशीन असतील तर 15 ईव्हीएम मशीनची पडताळणी केली जाऊ शकते.
निवडणुकीत प्रत्यक्ष झालेल्या ईव्हीएम मशीनवरील मतांची आणि व्हीव्हीपॅटची तपासणी केली जात नाही. आक्षेप घेतलेल्या मशीनवरील सर्व डेटा डिलीट करून नव्याने त्याच मशीनवर मॅाकपोल (चाचणी मतदान) घेतले जाते. यावेळी 1400 पर्यंत मतदान करता येते. चाचणी मतदान केल्यानंतर ईव्हीएम मशीनवरील मतांची आणि व्हीव्हीपॅट मते तपासून (टॅली) घेण्यात येतात. म्हणजेच ईव्हीएम मशीनवरील मतांची आणि व्हीव्हीपॅटवरील आकडेवारी जुळते का हे तपासून पाहिले जाते.
सोलापूर शहर उत्तरमधील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांनीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. या मतदारसंघातील दोन मतदान केंद्रातील दोन मशिनची पडताळणी करण्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज दाखल केला आहे. या पडताळणीसाठी लागणारे 94 हजार 400 रुपयांचे चलनही त्यांनी भरले आहे.