सोलापूर,दि.4: संत तुकाराम चौक येथील डांबरी रस्त्याचे विनापरवाना खोदाई करून सोलापूर महानगरपालिकेचे नुकसान केल्याप्रकरणी रिलायन्स कम्युनिकेशन चे कर्मचारी 1)प्रकाश पांडुरंग राऊत 2)शिवानंद गणपती सराटे 3) अमरनाथ गौरीशंकर कडगे 4) राहुल सदाशिव गवळी 5) पुरुषोत्तम दादासाहेब शेलार 6) शखफरदिन
जहांगीर जमादार यांची मे.चिफ ज्युडिशियल मँजिसे्टेट वर्ग-1 (भंडारी) यांनी निदोष मुक्तता केली.
यात हकीकत अशी की, संत तुकाराम चौक नजीकच्या रिलायन्स टॉवर शेजारील अंतर्गत रस्त्याचे नव्याने डांबरीकरणाचे काम महानगरपालिका कडून झालेले होते. सदर रस्त्यावरील डांबरीकरणाचे खोदाई केल्याची तक्रार तेथील स्थानिक नागरिकाने नगर अभियंता, सोलापूर यांना फोनद्वारे तक्रार दिलेली होती. सहाय्यक अभियंता युसूफ मुजावर यांनी सोलापूर महानगरपालिका आवेक्षक सागर खरोसेकर यांना शहानिशा करण्यासाठी व पाहण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर पाठविले होते, सदर रस्त्यावर सहा ते सात मीटर खोदाई केल्याचे दिसून आले व सदर ठिकाणी रिलायन्स टॉवरला वीज कनेक्शन घेण्यासाठी महावितरण कंपनीचे केबल घेण्याकामी खोदाई केली आहे असे नागरिकांनी सांगितले व सदर खोदाई करून डांबरी रस्त्याचे सुमारे दहा ते पंधरा हजार रुपयांचे नुकसान केल्याचे दिसून आल्याने सोलापूर महानगरपालिकेचे आवेक्षक सागर खरोसेकर यांनी सदर बाजार पोलीस स्टेशन येथे रिलायन्स कम्युनिकेशनचे सहा कर्मचाऱ्याविरुद्ध फिर्याद दाखल केली होती.
यामध्ये पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध कोर्टात दोषारोपपत्र दाखल केलेले होते. यात रिलायन्स कम्युनिकेशन्सचे सहा कर्मचाऱ्यांतर्फे अॅड. संतोष न्हावकर यांनी युक्तिवाद करताना आरोपींनी गुन्हा केल्याचा सबळ पुरावा न्यायालयासमोर आणण्यात सरकारपक्ष अयशस्वी ठरल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले. सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानून कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.