सोलापूर,दि.8: 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आले असून NDA आघाडी 293 जागांसह केंद्रात सरकार स्थापन करणार आहे. तर इंडिया अलायन्सने 234 जागा जिंकल्या आहेत. हे आकडे एक्झिट पोलचे निकाल आणि निवडणूक विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा खूपच वेगळे आहेत. यावर इंडिया टुडेने निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केली.
इंडिया टुडेशी संवाद साधताना प्रशांत किशोर यांनी भाजपच्या जागा कमी होण्यामागची कारणे सांगितली. निवडणूक निकालांबाबतचे त्यांचे भाकीतही चुकीचे ठरल्याचे त्यांनी मान्य केले. यावेळी त्यांनी भाजपच्या ‘400 पार’ या घोषणेचाही उल्लेख केला.
भाजपाच्या जागा कमी होण्यामागील कारणं सांगताना प्रशांत किशोर म्हणाले की, “‘400 पार’चा हा नारा कोणी लिहिला, या नाऱ्यामध्ये काहीही चुकीचं नाही, पण हा अपूर्ण नारा आहे. ‘400 पार’ आहे पण कशासाठी? त्यांनी ते असंच सोडून दिलं. 2014 मध्ये ज्याप्रमाणे ‘बहुत हुई महंगाई की मार, अबकी बार मोदी सरकार’ असा नारा दिला होता. कारण मोदी सरकार का हवंय तर महागाई आहे हा उद्देश स्पष्ट होता.”
प्रशांत किशोर म्हणाले… 400 पार नाऱ्यामुळे नुकसान
“यावेळी तुम्ही 400 पार असं म्हटलं, समाजाने हे अहंकार म्हणून घेतलं आणि विरोधकांनी हे संविधान बदलतील असं सांगितलं. ज्यांनी कोणी पक्षासाठी हा नारा लिहिला त्यांनी 400 पार का? हेच सांगितलं नाही. 400 पार हा नारा दिल्यामुळेच भाजपाचं सर्वत्र नुकसान झालं आहे.”
प्रशांत किशोर पुढे म्हणाले, ‘भाजपचा सर्वात कमकुवत दुवा म्हणजे मोदींवर जास्त अवलंबून राहणे. कार्यकर्ता म्हणाला, 400 जागा येत आहेत, त्यांना (खासदार) धडा शिकवावा लागेल. तुम्ही माझ्या क्षेत्राचे उदाहरण घेऊ शकता, आर के सिंह यांचं उदाहरण घेऊ शकता. तुम्ही कोणालाही विचारा लोक म्हणतात की, चांगलं काम केलं, चांगले मंत्री राहिले पण कार्यकर्ते नाराज होते कारण ते त्यांना भाव द्यायचे नाही.”
वाराणसीचे उदाहरण दिले
ते म्हणाले, ‘आपण नक्कीच जिंकतोय, असे भाजप समर्थकांना वाटत होते. काही उद्देश नव्हता कारण 400 आधीच पार केले जात होते. याउलट जे भाजप आणि मोदींच्या विरोधात होते, त्यांना आपण कोणत्याही मार्गाने रोखलेच पाहिजे, असे उद्दिष्ट होते. मी तुम्हाला वाराणसीचे उदाहरण देतो. 2014 च्या तुलनेत मोदींच्या स्वतःच्या जागेवरील मतांची टक्केवारी केवळ 2 टक्क्यांनी कमी झाली आहे. परंतु त्यांच्या प्रतिस्पर्ध्याचे मताधिक्य 20.9 वरून 41 टक्क्यांपर्यंत वाढल्याने फरक लक्षणीयरीत्या खाली आला.
प्रशांत किशोर यांचा अंदाज चुकला यावर प्रशांत किशोर म्हणाले, ‘कोणीही चुकीचे असू शकते. या निवडणुकीत हिरो म्हणून समोर आलेले अखिलेश यादव. विधानसभा निवडणुकीत 400 जागा होतील असे ते म्हणाले होते पण 125 आल्या. याचा अर्थ अखिलेश यांनी आपली राजकीय समज आणि पकड गमावली आहे असे नाही. अमित शहा म्हणाले की बंगालमध्ये 200 जागा येतील, पण त्या आल्या नाहीत, याचा अर्थ अमित शहांना राजकारण कळत नाही असे नाही. राहुल गांधी म्हणाले की, मध्य प्रदेशात आमचे बहुमताचे सरकार येणार आहे, आम्ही 200 जागा जिंकणार आहोत, मध्य प्रदेशचा पराभव झाला. याचा अर्थ राहुल गांधींना राजकीय समज नाही असे नाही. या निवडणुकीतही आमचा आकडा चुकीचा ठरला आहे, असे आम्ही मानतो पण भाजपला केवळ 180 जागा मिळतील, असे ज्यांनी म्हटले होते तेही चुकीचे सिद्ध झाले आहेत.