Eknath Shinde: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर

0

मुंबई,दि.26: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदाr संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रदर्शित केला आहे. महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुफानी मुलाखत ‘सामना’ला दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली.

सामनामधील मुलाखतीमधून उद्धव ठाकरे यांनी बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांचा पालापाचोळा असा उल्लेख केला होता. तसेच वादळात पालापाचोळा उडतोय, तो खाली बसला की खरं चित्र लोकांसमोर येईल, असं विधान केलं होतं. त्याला आता एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांना वाटतंय की आम्ही पालापाचोळा आहोत, पण या पालापाचोळ्यानेच इतिहास घडवलेला आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या सामनामधील मुलाखतीबाबत विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यांना आणखी काय बोलायचं ते बोलून होऊ द्या, म्हणजे आपण एकत्रित काय ते बोलू. पण त्यांना वाटतंय की आम्ही पालापाचोळा आहोत, पण या पालापाचोळ्यानेच इतिहास घडवलेला आहे. इतिहास घडवणारे कोण असतात हे या जनतेला माहिती आहे. ते या जनतेने पाहिले आहे.

आमची लढाई सत्तेसाठी नाही, तर आमची लढाई ही बाळासाहेबांच्या विचारांसाठी आहे. बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्हाला पालापाचोळा, पानगळ काय म्हणायचं हा त्यांचा आधिकार आहे. मात्र पुन्हा एकदा सांगतो या पालापाचोळ्यानेच इतिहास घडवला आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here