सुनावणीच्या आधीच एकनाथ शिंदेंचं न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र

0

मुंबई,दि.२: सर्वोच्च न्यायालयात उद्या (दि.३) एकनाथ शिंदे व १५ आमदारांवर कारवाई संदर्भात सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे सरकारच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या आणि अपात्रतेसंदर्भातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार आहे. मात्र या सुनावणीच्या दोन दिवस आधीच राज्याचे मुख्यमंत्री आणि बंडखोरांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी खरी शिवसेना कोणती या वादावर निर्णय घेण्याची मुभा केंद्रीय निवडणूक आयोगाला द्यावी, असे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. शिंदे सरकारची वैधता, खरी शिवसेना कोणाची या मुद्द्यांवर निवडणूक आयोगापुढील वाद, आमदार अपात्रता या मुद्द्यांवर शिवसेना नेत्यांनी सादर केलेल्या याचिका फेटाळून लावाव्यात, अशी विनंती त्यांनी न्यायालयास केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्याबरोबर केवळ १५ आमदार असून आपल्यामागे ४० आमदार आहेत. ठाकरे यांचा गट अल्पमतात असून त्यांची मागणी मान्य केल्यास अवघड राजकीय परिस्थिती निर्माण होईल. ठाकरे यांच्याबरोबर असलेल्या १५ आमदारांचा गट ४० आमदारांना बंडखोर ठरवून अपात्र ठरविण्याची मागणी करू शकत नाही, असंही शिंदे यांनी या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. शिवसेनेतील आमदारांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या बैठकीत लोकशाही पद्धतीने व बहुमताने पक्षांतर्गत निर्णय घेतले. त्या निर्णयांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करू नये, अशी विनंती शिंदे यांनी न्यायालयास केली आहे.

शिवसेना फुटीसंदर्भातील आणि राज्य सरकारच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी व न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या त्रिसदस्यीय पीठापुढे बुधवारी सुनावणी होणार आहे. त्यावेळी या महत्वपूर्ण मुद्द्यांवर न्यायालय अंतरिम आदेश देण्याची शक्यता आहे. ही सुनावणी १ ऑगस्ट रोजी होणार होती. मात्र सुनावणी लांबणीवर गेल्याने शिवसेना नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. शिंदे सरकारच्या वैधतेला, विधानसभा अध्यक्षांच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका आणि शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत विधानसभा उपाध्यक्षांनी दिलेल्या नोटिशींना आव्हान देणाऱ्या याचिकांवर बुधवारी एकत्रित सुनावणी होईल.

केंद्रीय निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना कोणाची हे ठरविण्यासाठी पुरावे दाखल करण्यासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांना ८ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. त्या निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणीची विनंती सरन्यायाधीशांना गेल्या आठवडय़ात करण्यात आली होती. ही याचिकाही अन्य याचिकांबरोबर सुनावणीसाठी येणार आहे.

या सर्व याचिकांवर सरन्यायाधीश एन व्ही. रमणा, न्यायाधीश कृष्णमुरारी आणि न्यायाधीश हिमा कोहली यांच्या त्रिसदस्यीय पीठापुढे २० जुलैला सुनावणी झाली होती. त्यावेळी काही मुद्द्यांवर हे प्रकरण घटनापीठाकडे पाठविण्याचा विचार करावा लागेल, असे सूतोवाच सरन्यायाधीशांनी केले होते. त्यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मात्र तशी आवश्यकता वाटत नसून त्रिसदसीय पीठाने निर्णय देण्याची विनंती केली होती़ तसेच काही वकिलांनी हे प्रकरण घटनापीठाकडे सोपविण्याची विनंती केली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here