शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंच्या अपघाताची चौकशी होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई,दि.१४: शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात होऊन त्यांचं निधन झाल्याची घटना घडली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. विनायक मेटे यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. विनायक मेटे यांच्या कुटुंबियांची कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “ही अत्यंत दुर्दैवी घटना असून राज्य सरकार विनायक मेटे यांच्या कुटुंबासोबत आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

“या वृत्तावर माझाही विश्वास बसला नाही. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने ते संघर्ष करत होते. त्यांनी अनेक आंदोलनं केली. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचेही ते अध्यक्ष होते. मला ते ३-४ दिवसांपूर्वीदेखील भेटले होते. त्यांचा एकच ध्यास होता की आता तुम्ही दोघं आहात. त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळेल. आज आम्ही एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. पण दुर्दैवाने त्यांचं दु:खद निधन झालं आहे. सरकार त्यांच्या परिवारासोबत आहे. विनायक मेटेंच्या पत्नीवरदेखील दु:खाचा डोंगर कोसळला आहे”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

विनायक मेटे यांच्या सहकाऱ्याने घटनास्थळी वेळेवर मदत पोहोचली नसल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात माहिती तपासली जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. “आरोपांच्या बाबतीतील माहिती तपासून घेतली जाईल. पण ही झालेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेची चौकशी वगैरे या सगळ्या गोष्टी होतील”, असं त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, एमजीएम रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. कुलदीप सलगोत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक मेटेंचा मृत्यू डोक्याच्या मागच्या बाजूला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे झाल्याची शक्यता आहे. “विनायक मेटेंचा अपघात पहाटे ५ च्या सुमारास रसायनीजवळ अपघात झाला. त्यांना फार गंभीर जखमा झाल्या होत्या. बहुतेक त्यांचं घटनास्थळीच निधन झालं होतं. त्यांना ६ वाजून २० मिनिटांनी आमच्या रुग्णालयात आणलं गेलं. इथे आणल्यानंतर त्यांना लगेच तपासण्यात आलं. त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यांच्यासोबत गाडीचे चालक आणि बॉडिगार्ड होते. बॉडिगार्डला देखील गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या चालकाची प्रकृती स्थिर आहे”, अशी माहिती सलगोत्रा यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here