दि.9: आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मंत्रिमंडळ विस्तारात भारतीय जनता पार्टीलाकडून 9 जणांनी तर शिंदे गटाकडून 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळ विस्तारात प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचा समावेश नव्हता. मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्यामुळे काही अपक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीपद देतो म्हणून मला शब्द दिला होता, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.
मंत्रीमंडळ विस्तारानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ‘नाराज आहे असा विषय नाही, प्रत्येकाला वाटतं मी मंत्री बनले पाहिजे. मला मंत्रिपदासाठी थांबवले म्हणजे कायमचं थांबवलं नाही, काही दिवसासाठी थांबवलं आहे… एकत्र राहायचं म्हणजे समजून घ्यावे लागणार.’
काही अडचणी वरिष्ठांना असतील तर आपण समजदारी घेतली पाहिजे. मला शब्द दिला होता, ते करतो म्हणले होते… मंत्रीपद देतो म्हणून हा शब्द मला दिला होता. हा शब्द जरी पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात पाळला गेला नाही तरी मला विश्वास आहे दुसऱ्या वेळेस जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा मंत्रीपद मिळेल, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केलाय.
अकेला बच्चू कडू काफी है
मुख्यमंत्र्यांचा मला स्वतः फोन आला होता त्यांनी मला सगळं सांगितलं. मी त्यांना बोललो काही हरकत नाही. आता मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा लागेल, नाहीतर अडचण होईल. तुम्हाला जर या पदावर काढलं तर तुमच्यात नाराजी राहणार नाही ? थोडीशी नाराजी असतेच ती दूर होईल. नाराजी दूर नाही झाली तर अकेला बच्चू कडू काफी है, असे बच्चू कडू यांनी सांगितलं.
सप्टेंबरमध्ये दुसरा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, मंत्रिमंडळ अजून पूर्ण झालेले नाही. पुढे जेव्हा विस्तार होईल त्यात महिलांना सुद्धा स्थान दिले जाईल, असे बच्चू कडू यांनी सांगितलं.