मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पोस्ट पाहून लोकांना पडला प्रश्न; नेमकं राष्ट्रपती कोण झालंय?

0

मुंबई,दि.२२: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पोस्ट पाहून लोकांना प्रश्न पडला आहे की नेमकं राष्ट्रपती कोण झालंय? राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी बाजी मारली आहे. त्यांनी विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. द्रौपदी मुर्मू यांना ८१२ मतं तर यशवंत सिन्हा यांना ५२१ मतं मिळाली आहेत.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) द्रौपदी मुर्मू यांनी ६ लाख ७६ हजार ८०३ इतके मतमूल्य मिळवून विजय मिळवला. विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या पारडयात केवळ ३ लाख ८० हजार १७७ इतके मतमूल्य जमा झाले. या विजयानंतर सर्वच स्तरामधून मुर्मू यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावर होत असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीनेही मुर्मू यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र सरकारअंतर्गत येणाऱ्या सरकारी कार्यालयाकडून पोस्ट करण्यात आलेल्या या अभिनंदनाच्या पोस्टमध्ये मुर्मू यांचा फोटोच नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. या पोस्टमध्ये एकनाथ शिंदेंचा फोटो दिसत असून यावरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केलीय. किमान ज्या राष्ट्रपती झाल्या आहेत त्यांचा तरी फोटो लावायला हवा होता असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. तर काहींनी ही अभिनंदनाची पोस्ट पाहून राष्ट्रपती कोण झालंय हेच कळत नसल्याचा उपाहासात्मक टोला लगावला आहे.

महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत पेजवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुर्मू यांच्या विजयानंतर त्यांचं अभिनंदन करताना काय म्हटलंय यासंदर्भातील पोस्ट शेअर केलीय. “भारताच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदावर निवड झाल्याबद्दल श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. ‘श्रीमती मुर्मू यांची निवड भारतीय महिला जगत तसेच आदिवासी समाजाच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि अभिमानास्पद अशी आहे- मुख्यमंत्री”, अशा कॅप्शनसहीत मुर्मू यांच्या विजयानंतर या या पेजवरुन एक फोटो शेअर करण्यात आलाय. मात्र या फोटोमध्ये केवळ एकनाथ शिंदेंच दिसत अशून बाजूला महाराष्ट्र शासन असं लिहिण्यात आलं आहे.

मात्र हा फोटो अनेकांना खटकला असून कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी यासंदर्भात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here