मुंबई,दि.6: प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा धक्का देणार आहेत. कडू हे महायुतीतून बाहेर पडले आहेत. ते तिसरी आघाडी स्थापन करत आहेत. कडू यांना निवडणुकीआधीच धक्का बसण्याची शक्यता आहे. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल बच्चू कडूंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे.
मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याची कार्यक्रम पत्रिका समोर आली आहे. या पुत्रिकेवरून बच्चू कडू यांचा फोटो गायब आहे, तर एकनाथ शिंदे यांचा फोटो मोठ्या आकारात छापण्यात आला आहे. या पत्रिकेमुळे आमदार राजकुमार पटेल शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
भाजप आणि शिवसेना जी खेळत आहे, त्याचा झटका त्यांना विदर्भात दिसेल, असा इशारा कडू यांनी दिला. प्रत्येकाचा राजकीय स्वार्थ असतो त्यामुळे ते जात असेल त्याची आम्हाला परवा नाही आहे त्यांनी सुखात राहावं. राजकुमार पटेल आणि माझे मतभेद असूच शकत नाही राजकुमार पटेल अतिशय दिलदार माणूस आहे. त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी केलेलं हे काम आहे, असे ते म्हणाले.