मुंबई,दि.८: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे भाजपची बदनामी करत असल्याचा आरोप केला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी यावर प्रत्युत्तर देत अनेक बाबींवर भाष्य केलं. “४० वर्ष अहोरात्र भाजपचं काम आम्ही केलं. मेहनतीचं फळ म्हणून मला मंत्रिमंडळात चांगलं स्थान दिलं. भाजपनं मला काहीच दिलं नाही असं मी कधीच म्हटलं नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
एकनाथ खडसे यांचे प्रत्युत्तर
“ज्यांचं भाजपमध्ये काहीच योगदान नाही त्यांनाही आता चार-पाच खाती मिळतायत. आम्हाला सात खाती दिली, १० खाती दिली याचं फार कौतुक नाही. तो आमचा अधिकार होता. तुम्हाला मुख्यमंत्रिपदावर मी नको होतो म्हणून १०-१२ खाती घ्या म्हणून सांगितलं. स्पर्धकच कमी झाला पाहिजे म्हणून काय पाहिजे ते घ्या आणि मंत्रिमंडळात या असा विषय होता. मी भाजपची बदनामी केली नाही. भाजपच्या कोणत्याही नेत्यावर किंवा कोणत्याही विषयावर मी काहीही बोललेलो नाही,” असं वक्तव्य खडसेंनी केलं. माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.
माझा जो छळ सुरुये तो कोण करतंय?
“हे सर्व झाल्यानंतर माझा जो छळ सुरुये तो कोण करतंय? पडद्याच्या आडून ईडी, अँटी करप्शन लावायचं, इन्कम टॅक्स मागे लावायचं हे कोण करतंय हे सर्वांना माहित आहे. मी ४० वर्ष चोर, बदमाश नव्हतो, मग एकाच दिवसात दाऊदच्या पत्नीसोबतचा विषय, विनयभंगाचा गुन्हा दाखल करणं अशा अनेक गोष्टी घडल्या. जे एक दोन लोक आहेत त्यांच्यामुळे बदनामी होतेय, या प्रवृत्तींमुळे लोकं दूर गेले,” असंही खडसेंनी नमूद केलं.
भाजपनं ऐनवेळी माझं तिकिट कापलं
“४० वर्ष हमाली केल्यानंतरही भाजपनं ऐनवेळी माझं तिकिट कापलं. त्यानंतर मला राष्ट्रवादीनं मला आमदार केलं. त्यामुळे मी राजकारणात आहे. माझा राग भाजपवर नव्हता आणि नाही हे मी देवेंद्र फडणवीसांना सांगू इच्छितो. तुम्हाला तसं वाटत असेल तर त्याचं उदाहरण दाखवा,” असंही ते म्हणाले.