वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर शाळेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं मोठं विधानं

0

मुंबई,दि.५: वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर शाळेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी मोठं विधानं केलं आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम इतका जाणवला नाही. कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर सर्व निर्बंध हटल्याने गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र या महिन्याच्या सुरुवातीपासून अचानक रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेसह सरकार अलर्ट झाले आहे. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी मास्कसक्ती नसली तरी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे आता कोरोनाचे अजून निर्बंध लागणार का? तसेच उन्हाळी सुट्टी संपल्यावर शाळा पुन्हा वेळेवर सुरू होणार का? असा प्रश्न पालकांच्या मनात निर्माण झाला आहे. दरम्यान, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठं विधान केलं आहे.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे शाळा ह्या बहुतांशी ऑनलाईन सुरू ठेवण्यात आल्या होत्या. तसेच फारच कमी काळासाठी विद्यार्थी शाळेत आले होते. त्यामुळे आतातरी नव्या शैक्षणिक वर्षात शाळा वेळेत सुरू होऊन वर्षभर व्यवस्थित अभ्यासक्रम पूर्ण होईल का? असा प्रश्न पालकांना पडला आहे. दरम्यान, शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी शाळांबाबत एसओपी तयार करणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच काळजी घेऊन शाळा सुरू केल्या जातील. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नाही, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

याबाबत माहिती देताना वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, राज्यातील कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही आरोग्य विभागाचा सल्ला घेणार आहोत. याआधीही आम्ही शाळांबाबत एसओपी तयार केल्या होत्या, यावेळीही तशी पावले उचलली जातील. मात्र चर्चा करूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. तसेही शाळा सुरू करणे ही काळाची गरज आहे. कारण दोन वर्षांपासून मुलांचं मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झालेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं अजून नुकसान होऊ नये म्हणून काळजी घेऊन शाळा सुरू करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सातत्याने रुग्ण वाढत असून, मागचे दोन तीन दिवस हा आकडा एक हजाराच्या वर गेला आहे. काल राज्यात १३०० हून अधिक कोरोना रुग्ण सापडले होते. त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here