सोलापूर: भूकंपासंदर्भात पूर्वसूचना देणारी यंत्रणा विद्यापीठात उभी !

0

सोलापूर, दि.23: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर (Solapur) विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये भुकंपासंदर्भात पूर्वसूचना देणारी यंत्रणा (Earthquake warning system) उभी करण्यात आली आहे. मुंबईच्या भाभा परमाणु अनुसंधान केंद्राकडून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे आता सोलापूर (Solapur) पासून सुमारे साडेचारशे ते पाचशे किलोमीटर परिसरातील भूकंपासंदर्भात (Earthquake) पूर्वसूचना पंधरा दिवस आधी मिळणार आहे.

रेडॉन जिओ स्टेशन असे या केंद्राचे नाव आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते याचे लोकार्पण झाले. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास पाटील, विद्यापीठातील भूगर्भ विषयाचे प्रा. डॉ. धवल कुलकर्णी, डॉ अंजना लावंड, डॉ. माया पाटील, प्रा. योगेश दुरुगवार, डॉ. विनायक धुळप, डॉ. एस. पी. बाविस्कर आदी उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर (Solapur) विद्यापीठ आणि भाभा परमाणु अनुसंधान केंद्र, मुंबई यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे संशोधनासाठी आणि परिसरातील भूकंपासंदर्भातील (Earthquake) माहिती मिळवण्यासाठी ही यंत्रणा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये उभी करण्यात आली आहे. तीन फूट जमिनीखाली बसवलेले हे उपकरण स्वतः बाबा अनुसंधान केंद्राने बनवले असून सौर ऊर्जेवर ही यंत्रणा चालते. रेडॉन गॅस हा रेडिओ ॲक्टिव्ह सामग्रीचे बाय प्रॉडक्ट आहे. भूकंपाच्या हालचाली जमिनीमध्ये सुरू झाल्यानंतर हे उपकरण रेडॉनचे उत्सर्जन मोजते. अशाप्रकारची भूकंपपूर्व क्रिया होण्यापूर्वी पाण्याच्या झऱ्यामध्ये रेडॉनचे प्रमाण वाढल्याचे आधीच आढळून आले आहे. हे उपकरण रेडॉन शोधून काढून लाभला सिग्नल पाठवते. भूकंप होण्यापूर्वी जमिनीत हालचाली सुरू झालेल्या असतात. त्या संदर्भाची माहिती या यंत्रणेकडून प्राप्त होते. त्यामुळे सतर्कता बाळगण्यात सर्वांना मदत मिळते अशी माहिती डॉ. धवल कुलकर्णी यांनी दिली.

विद्यापीठात बसवण्यात आलेल्या या रेडॉन जिओ स्टेशनमुळे विद्यार्थी व अभ्यासकांना संशोधन करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्याचा फायदा विद्यार्थी व अभ्यासकांनी घेतला पाहिजे. तसेच या उपक्रमामुळे भुकंपासंदर्भात पूर्व सूचना मिळून सतर्क राहण्यास मदत मिळणार असल्याचे असे मत कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here