…तर मतदारांवर गुन्हा दाखल करण्यात येणार: आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे

0
डॅा. सचिन ओम्बासे

सोलापूर,दि.१८: सोलापूर महापालिका निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार आहे. राज्यातील सर्व महानगरपालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. महापालिका निवडणुकीत एखाद्या व्यक्तीने दोन ठिकाणी मतदान केल्याचे आढळून आल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले.

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची बैठक मंगळवारी आयुक्तांच्या दालनात पार पडली.यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहायक आयुक्त गिरीष पंडित उपस्थित होते.

या बैठकीत मतदान केंद्रांबाबत राजकीय पक्षांनी उपस्थित केलेल्या विविध सूचना व अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मतदान केंद्रांची उपलब्धता, नागरिकांची सोय, प्रवेशयोग्यता तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित बाबींवर राजकीय पक्षांनी मते मांडली. या सूचनांचा विचार करून पुढील टप्प्यात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासोबत पुन्हा एक बैठक घेण्यात येणार असल्याचे आयुक्त ओम्बासे यांनी सांगितले.

मतदान केंद्रांची माहिती, निवडणूक खर्च, जाहिरातींचे नियम याबाबतही आयुक्तांनी मार्गदर्शन केले. शहरातील कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता जाहिराती लावू नयेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. 

दुबार मतदार होणार नाही याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. संवेदनशील बुथवर करडी नजर ठेवावी. सर्व मतदान केंद्रांवर सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात. पारदर्शक आणि निर्भय वातावरणात निवडणुका व्हाव्यात यासह विविध सूचना राजकीय पदाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.

यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे. यु. एन बेरिया, कॉग्रेस पक्षाचे संजय हेमगड्डी, केशव इंगळे, शिवसेना शिंदे गटाचे अमोल शिंदे, रिपब्लिकन पक्षाचे राजाभाऊ सरवदे, भाजपचे प्रवीण कांबळे, नागेश गंजी,कॉग्रेसचे देवा गायकवाड, एमआयएमचे शौकत पठाण, माकपाचे अनिल वासम, नरेश दुगणे, दाऊद शेख,आम आदमी पार्टीचे जुबेर हिरापुरे, निलेश सांगेपाग,अमोल पूदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महेश धाराशिवकर, प्रताप चव्हाण, बसपाचे शीलवंत काळे,गणेश डोंगरे,राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे वैभव गंगणे, शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन सलगर, मुस्ताक शेख,अब्दुल शेख, जनविकास क्रांती सेनाचे गुरनाथ कोळी,श् रीनिवास बोगा यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here