सोलापूर,दि.४: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. सोलापूर महानगरपालिके करिता १५ जानेवारीला मतदान होणार आहे तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल व इलेक्ट्रॉनिक मीडियावरील छुप्या प्रचाराला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेमार्फत माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती कार्यरत झाली आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.
पूर्वप्रमाणिकरण न करता सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक माध्यमे अथवा बल्क एसएमएसद्वारे प्रचार केल्यास तो पेड प्रमोशन म्हणून नोंदविला जाणार असून संबंधित खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात धरला जाणार आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर), युट्यूब, लिंक्डइन यांसह स्थानिक वृत्तवाहिन्या, एफएम रेडिओ आणि आकाशवाणीवरील जाहिरातींवर समितीमार्फत सतत लक्ष ठेवण्यात येणार आहे.
राजकीय पक्ष व उमेदवारांच्या वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटवरून केलेला मजकूर, फोटो, व्हिडिओ किंवा ऑडिओ संदेश हा राजकीय जाहिरात मानली जाणार नाही. मात्र अशा अकाउंटची संपूर्ण माहिती उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करणे बंधनकारक आहे. याउलट सोशल मीडियावरील जाहिराती, पेड प्रमोशन, बल्क एसएमएस, व्हिडिओ संदेश यांचे पूर्वप्रमाणिकरण आवश्यक राहणार आहे.
जाहिरात प्रसारणपूर्व समितीकडे अर्ज सादर करणे, जाहिरातीचा मजकूर, व्हिडिओ/ऑडिओ सीडी किंवा पेनड्राइव्हमध्ये देणे, जाहिरात निर्मिती खर्च, प्रसारण खर्च व कालावधी नमूद करणे,मतदान दिवशी प्रसिद्ध होणाऱ्या मुद्रित जाहिरातींचेही प्रमाणिकरण आवश्यक असून नार्थकोट येथील मीडिया सेंटरशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पूर्वप्रमाणिकरण न केलेल्या जाहिरातींची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात येणार असून उमेदवारांनी सर्व नियमांचे पालन करूनच प्रचार करावा, असे आवाहन आयुक्त डॉ ओम्बासे यांनी केले आहे.
माध्यम प्रमाणिकरण समितीचे अध्यक्ष हे आयुक्त आहेत तरसदस्य सचिव म्हणून जनसंपर्क अधिकारी हे काम पाहणार आहेत. पोलीस आयुक्त आचारसंहिता कक्ष प्रमुख, अतिरिक्त आयुक्त हे सदस्य असणार आहेत.








