सोलापूर,दि.१५: आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. फसवणूक करणारे अनेकदा मोठ्या पदावरील व्यक्तींच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. असाच प्रकार सोलापूर शहरात उघडकीस आला आहे. सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे (Dr. Sachin Ombase) यांच्या बनावट अकाऊंटवरुन नागरिकांना पैशाची मागणी करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
यासंदर्भात ओम्बासे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून तपास करण्यात येत आहे. शुक्रवारी हा प्रकार आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी सहकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करुन सायबर पोलिसांकडे धाव घेतली.
कुणीतरी अनोळखी व्यक्तीने डॉ. सचिन ओम्बासे यांच्या छायाचित्राचा वापर करून व्हाट्सप व फेसबुक या सोशल मीडिया अॅपवर बनावट (फेक) अकाउंट तयार केला आहे. या माध्यमातून काही नागरिक, तसेच ओम्बासे यांचा मित्रपरिवार आणि नातेवाईक यांच्याशी त्याने चॅट तसेच फोन करून पैशांची मागणी केली आहे.
या प्रकाराबाबत आयुक्त डॉ. ओम्बासे म्हणाले की, माझ्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक करण्याचा हा प्रयत्न आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही मेसेज किंवा फोनवर विश्वास ठेवू नये. संबंधित बनावट खात्याशी कोणताही व्यवहार करू नये.








