सोलापूर | बनावट डिग्री प्रकरणी डॉक्टरास जामीन मंजूर

0

सोलापूर,दि.15: बनावट डिग्री प्रकरणी न्यायालयाने डॉक्टरास जामीन मंजूर केला आहे. यात आरोपी डॉ. सी. के मंडल, रा. सोलापूर या आरोपीस बनावट डिग्रीप्रकरणी सोलापुर येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी जामीन मंजूर केला. यात हकीकत की, दि.14/07/2025 रोजी आरोग्याधिकारी यांना सोलापूर येथे डॉ. सी. के. मंडल हे बोगस डॉक्टर असल्याची माहिती मिळाली होती. 

माहिती मिळाल्यावरून त्यांच्या अधिपत्याखाली असलेले कर्मचारी फिर्यादी व त्यांचे सहकारी यांच्यासोबत नकली रूग्ण यांच्यासह सदर डॉक्टरची खात्री करण्याकरीता तेथे गेले. सदर दवाखान्यात नकली रूग्ण म्हणून एका इसमास उपचारा करीता रात्री पाठविले. त्यावेळी डॉ. सी. के. मंडल व त्याच्या सोबतीचे स्टाफ एक महिला व एक पुरूष यांनी नकली रुग्ण यांची प्राथमिक तपासणी केली.

डॉ. सी. के. मंडल यांच्या सांगण्यानुसार फिर्यादी यांनी पाठविलेल्या फिर्यादी यांच्या ओळखीचे नकली रुग्ण यांना पुरूष स्टाफ यांने इंजेक्शन दिले व डॉ.सी. के. मंडल यांनी औषधे लिहून दिले. तसेच फिर्यादी यांच्या सहकारी कर्मचारी पैकी स्टाफ नर्स यांना आरोग्याधिकारी यांच्या आदेशान्वये रूग्ण म्हणून डॉ. सी. के. मंडल यांच्या आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये मुळव्याध आजाराच्या तपासणी करीता पाठविले. 

त्यावेळी डॉ. सी. के. मंडल यांनी कर्मचारी पैकी स्टाफ नर्स यांची तपासणी करून तात्पुरत्या स्वरूपात औषत्र गोळ्या देऊन त्यांना ऑपरेशन करावे लागेल व ऑपरेशनचा खर्च रूपये 15000/-सांगितले. परंतु कर्मचारी पैकी स्टाफ नर्स यांना मुळव्याधीचा त्रास नसताना देखील ऑपरेशन करण्यास चुकीचे सांगितले. 

त्यामुळे आरोग्याधिकारी व फिर्यादी यांना सदरचा डॉक्टर बोगस असल्याची खात्री झाल्याने फिर्यादी यांनी स्टाफ सह सी. के. मंडल यांच्या आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये जाऊन समक्ष पाहणी व तपासणी केली असता, संबंधित डॉक्टरकडे वैद्यकिय अर्हताबाबत विचारणा केली त्यावेळी डॉ. सी. के. मंडल यांनी माझे BAMS पदवी झाली असून सदरची महिला स्टाफ ही माझी पत्नी व पुरुष स्टाफ हा माझा नातेवाईक आहे असे सांगितले. त्यावेळी फिर्यादी यांनी सदर आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये पाहणी व तपासणी केली असता सदर डॉक्टरकडे बोगस डिग्री सर्टीफिकेट, आढळून आले आहे. 

तसेच सदर डॉक्टर हा मुळव्याध, हायड्रोक्लीस, पाईल्स, फिस्तुला, संधीवात आणि सेक्स स्पेशालिस्ट उपचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तो जनरल प्रॅक्टीस, ड्रेसिंग करणे इंजेक्शन देणे व अॅलोपॅथीची सर्व औषधे रुग्णांना देत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यावेळी डॉक्टरकडे विचारपूस केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देवू लागला. सदर रूग्णांवर उपचार केलेली सर्व औषधे, वैद्यकिय प्रमाणपत्र, रूग्णांचे रजिस्टर व इतर औषधे व साहित्य असे जागीच पंचनाम्याप्रमाणे जप्त करण्यात आले. 

त्यानंतर डॉ. सी. के. मंडल यांना शैक्षणिक अर्हतेबाबत (प्रमाणपत्र) बाबत विचारपूस केली तसेच त्यांची पत्नी व त्यांच्या सोबत असलेले नातेवाईक यांच्याकडे देखील प्रमाणपत्राबाबत चौकशी केली असता, त्यांच्याकडे कोणतेही वैद्यकिय प्रमाणपत्र दिसून आले नाही. त्यानंतर खात्री झाली की, सी. के. मंडल यांनी कुठल्याही प्रकारचे नोंदणीकृत व नेमणूक नसल्याचे दिसून आले. 

तसेच कुठल्याही पदवी, पदवीका यांचे सत्यभासी नसल्याचे दिसून आले. त्यामुळे सदर सी. के. मंडल व पत्नी तसेच नातेवाईक हे बोगस डॉक्टर असल्याचे निर्देशनास आले आहे. त्यानुसार त्यांची वैद्यकीय व्यवसायाकरीता लागणारी शौक्षणिक पात्रता नसल्याचे व नोंदणीकृत वैद्यकिय व्यवसायिक नसल्याचे तसेच त्याची शौक्षणिक पात्रता नसताना देखील ते बेकायदेशीरपणे वैद्यकिय व्यवसायीक प्रॅक्टीस करून ते डॉक्टर उपादी लावून त्यांनी सामान्य नागरीक व प्रशासनाची फसवणूक केलेली आहे अशा आशयाची फिर्याद फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे दाखल झाली होती.

सदर कामी आरोपी डॉ. सी. के मंडल, रा. सोलापूर यांनी अॅड. अभिजीत इटकर यांच्या मार्फत जामीन मिळणे कामी सोलापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी  यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केलेला होता. यात आरोपी तर्फे केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन सोलापुर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपी डॉ. सी. के मंडल, रा. सोलापूर याचा जामीन अर्ज मंजूर केला. यात आरोपीतर्फे अॅड. अभिजीत इटकर, अॅड. राम शिंदे , अॅड. संतोष आवळे, अॅड. फैयाज शेख, अॅड. सुमित लवटे यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here