ज्ञानदेव वानखेडेंचा नवाब मलिक यांच्या विरोधात मानहानीचा दावा : हायकोर्टानं दिले ‘हे’ निर्देश

0

मुंबई,दि.८: समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांनी नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या विरोधात केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. क्रूझ ड्रग पार्टीवर एनसीबीचे समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी कारवाई करत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही अटक केली होती. ड्रग पार्टीवर करण्यात आलेली कारवाई बोगस होती असा दावा राष्ट्रवादीचे नेते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला होता. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा दावा केला होता. तसेच वानखेडे यांनी धर्मांतर करून नोकरी मिळविल्याचा दावाही केला होता. नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने पत्रकार परिषद घेत आरोप करत आहेत.

खंडणीचा आरोप झालेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात केलेल्या दाव्याची मुंबई उच्च न्यायालयानं दखल घेतली आहे. न्यायालयानं मलिक यांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी बुधवारी सुनावणी होणार आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. वानखेडे हे खंडणी वसुली करतात. त्यासाठी खोटी प्रकरणं उभी करतात. आर्यन खान, समीर खान यांच्यासह अन्य २६ प्रकरणांची यादीच मलिक यांनी जाहीर केली होती. ही सर्व प्रकरणे बोगस असून त्यातील साक्षीदार समीर वानखेडे यांच्या जवळचे आहेत, असा दावा मलिक यांनी केला होता.

मलिक यांच्या या आरोपांमुळं गेल्या महिनाभरापासून वानखेडे कुटुंब मीडियात चर्चेत आहे. वानखेडे कुटुंबीयांनी मलिक यांचे आरोप फेटाळल्यानंतरही मलिक नवनव्या गोष्टी पुढं आणत आहेत. त्यामुळं संतापलेल्या ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. ‘मलिक हे रोज नवे निराधार जाहीर आरोप करून आमची बदनामी करत आहेत. त्यामुळं आमची प्रतिमा मलिन होत आहे. सोशल मीडियातून धमक्या मिळत आहे. आमच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात आहेत. याचा आम्हाला प्रचंड मानसिक त्रास होत आहे, असं ज्ञानदेव वानखेडे यांनी अर्जात म्हटलं आहे. न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठापुढं आज हा अर्ज सुनावणीसाठी आला तेव्हा खंडपीठानं मलिक यांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आणि या प्रकरणाची सुनावणी बुधवारी ठेवली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here