Disha Salian Death: राजकारणामुळे आम्हाला खूप त्रास होतोय, आम्हा जगू द्या : दिशा सालियनच्या पालकांची भावना

0

मुंबई,दि.22:Disha Salian Death: दिशा सालियन (Disha Salian) हिच्या मृत्यू प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिशा सालियन प्रकरणात खळबळजनक दावा केला आहे. त्यासोबतच भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनीही दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर ट्विट केलं आहे. मुलीच्या आत्महत्येनंतर सुरू असलेले राजकारण वाईट असून आम्हालाही जगू द्या, असे भावूक आवाहन दिशा सालियन हिच्या पालकांनी केले आहे.

दिशा सालियनच्या मृत्यूवरून राजकारण सुरू झाले होते. सध्या सुरू असलेल्या आरोपांमुळे आम्ही व्यथित झाले असून आमच्या जीवाचे बरं वाईट झाल्यास नेत्यांना जबाबदार ठरवण्यात यावे असेही दिशा सालियनच्या आई-वडिलांनी म्हटले. माध्यमांशी संवाद साधताना दिशा सालियनच्या आई भावूक झाल्या होत्या.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या सदस्यांसह दिशा सालियनच्या पालकांची भेट घेतली. या भेटीमध्ये दिशा सालियनच्या आई वडिलांनी महिला आयोगाकडे तक्रार अर्ज केला. त्यानंतर दिशाच्या आई-वडिलांनी माध्यमांद्वारे आवाहन केले. दिशाच्या आई म्हणाल्या की, मुलीच्या आत्महत्येबाबत पोलिसांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांना या आधीच सगळी माहिती दिली आहे. मुलीच्या आत्महत्येवर उगाच राजकारण करू नये असे आवाहनही त्यांनी केले. राजकीय नेत्यांकडून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे आमच्या मुलीचा दररोज मृत्यू होत असल्याचे त्यांनी सांगितले. या सगळ्या प्रकरणात आम्हाला खूप त्रास होत असून आमच्याही मनात आत्महत्येचे विचार येत आहे आणि जीवाचं काही बरंवाईट झाल्यास आरोप नेत्यांना जबाबदार ठरवण्यात यावे असेही त्यांनी म्हटले.

आम्हाला जगू द्या; पालकांची विनंती

दिशा सालियनच्या मृत्यूवरून सुरू असलेल्या आरोपांवरून आम्ही व्यथित झालो आहोत. आम्हाला जगू द्या आणि तुम्हीही जगा असे आर्जव दिशाच्या आई-वडिलांनी केले आहे. आमच्या मुलीची नाहक बदनामी होत असून हे प्रकार थांबले पाहिजे अशी विनंती दिशा सालियनच्या आई-वडिलांनी केली आहे.

म्हणून दिशाची आत्महत्या

ऑफिसमधील तणावामुळे दिशाने आत्महत्या केली असल्याचे तिच्या पालकांनी माध्यमांना सांगितले. व्यावसायिक डील रद्द होत असल्याचे तिने घरी सांगितले होते. त्या तणावात ती होती असेही पालकांनी सांगितले. आम्ही ज्यांना मतदान करतोय तेच आमच्या मुलीला बदनाम करत आहेत अशी खंतही दिशा सालियनच्या आईने व्यक्त केली. पोस्टमार्टेम अहवालात तिच्या मृत्यूचे कारण समोर आलं आहे. तरीदेखील तिच्यावर बलात्कार झाला, तिची हत्या झाली असे सांगून बदनामी का करत आहात, असा प्रश्नही दिशाच्या आईंनी उपस्थित केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here