मुंबई,दि.15: मंत्री उदय सामंत आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांची बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बरोबर शिवसेनेचे 40 आमदार व 12 खासदार गेले आहेत. त्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीच्याही अनेक पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. उदय सामंत आणि सुनिल तटकरे यांची भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून चर्चेला उधाण आलं आहे. मात्र, या भेटीवर आता राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली.
राष्ट्रवादीचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre) यांनीही शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला आहे. त्यामुळे, शिंदे गट आण भाजपत प्रवेशांची संख्या वाढत आहे. त्यातच, राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. या भेटीत बंद दाराआड चर्चा झाली असून राजकीय वर्तुळात चर्चाही होत आहे. मात्र, या भेटीचा कोणतीही गैरअर्थ काढू नका, असे अजित पवार यांनी स्पष्टच शब्दात सांगितले. मालेगावला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यासभेत विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी तटकरे आणि सामंत यांच्या भेटीवर स्पष्टीकरण दिलं.
‘राजकीय जीवनामध्ये नेत्यांच्या भेटीगाठी घ्यावा लागत असतात, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली असेल. दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली असं कळलंय. पण, या भेटीबाबत गैर अर्थ काढून बोलू नका,’ असे पत्रकारांना उद्देशून म्हटले. तसेच, तसेच, सध्या महाराष्ट्रात अवघड परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी संकटात आहे, वाढत्या महागाईने जनता तर बेरोजगारीमुळे तरुण पिढी त्रस्त आहे, अशी टीकाही पवार यांनी केली.