किरीट सोमय्यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया!

0

मुंबई, दि.२४: भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya) गाडीवरील हल्ल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा(Naveet Rana) आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या(Uddhav Thackeray) मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करणार असा इशाऱ्या दिल्यानंतर मोठ्या नाट्यमय घडामोडी नंतर पोलिसांनी राणा दांपत्याला अटक केली. भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP Kirit Somaiya) हे राणा दाम्पत्याला भेट देण्यासाठी खार पोलीस स्टेशनला निघाले. मात्र त्याठिकाणी असलेल्या शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या वाहनावर दगडफेक, बाटल्या फेकून जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत हनुमान चालीसाच्या नावाने गोंधळ घालण्यात आल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यावेळी म्हणाले. “दोन घटना काल घडल्या आहेत. गेले दोन दिवस सतत हनुमान चालीसाच्या नावाने गोंधळ घालण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई म्हणून त्यांना अटक केली आहे. काल रात्री जी घटना घडली त्याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलीस आपली कारवाई करतील”, असं वळसे पाटील म्हणाले.

दरम्यान, यासंदर्भात सगळ्यांनी समजुतीनं घ्यावं, असं आवाहन वळसे पाटील यांनी केलं आहे. “दुर्दैवाने अशी घटना घडली आहे. पण त्यात सगळ्यांनीच समजुतीनं सहकार्य करायला हवं. दगडफेक झाली आहे हे खरं आहे. ती कुणाकडून झाली काय झाली, हा तपासाचा भाग आहे. त्याचा तपास करून पोलीस योग्य ती कारवाई करतील”, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली आहे.

या सर्व प्रकरणानंतर मुंबई पोलीस टीकेच्या केंद्रस्थानी आले आहेत. मुंबई पोलिसांच्या समोर किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याचा आरोप भाजपानं केलं आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांना काही वेगळे आदेश देणार का? अशी विचारणा करताच दिलीप वळसे पाटील यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं.

“पोलिसांना वेगळे आदेश देण्याची गरज नाही. पोलिसांना त्यांचं काम काय आहे हे माहिती आहे. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे”, असं ते म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here