सोलापूर,दि.29: श्री सिध्देश्वर सहकारी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी (Dharmraj Kadadi) यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेना (ठाकरे गट) सोडण्यात आला आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अमर पाटील यांनी सोमवारी (दि.28) उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र शिवसेनेच्या दबावामुळे माने यांना काँग्रेसने एबी फॉर्म दिला नाही. दिलीप माने यांनी आज (दि.29) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अशातच धर्मराज काडादी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
धर्मराज काडादी यांना राष्ट्रवादी (शरद पवार गट) एबी फॉर्म देण्यात आला आहे की नाही हे कळू शकले नाही. काडादी यांच्यामुळे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात चुरशी लढत होणार आहे. काडादी यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. तसेच या मतदारसंघात श्री सिध्देश्वर सहकारी कारखान्याचे सभासद मोठ्या प्रमाणात आहेत.