सोलापूर,दि.27: श्री. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी (Dharmraj Kadadi) यांनी जनसंवाद यात्रेत मोठं विधान केलं आहे. सिध्देश्वर परिवार आणि शेतकरी सभासद यांच्या आग्रहानंतर काडादी यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी जनसंवाद यात्रा सुरू केली आहे. कर्मयोगी अप्पासाहेब काडादी, वि. गु. शिवदारे, आनंदराव देवकते, दिनानाथ कमळे (गुरुजी), गुरुनाथ पाटील या दक्षिण सोलापुरात नेहमीच वैचारिक आणि विकासात्मक राजकारण केले आहे. त्यांनी शेवटच्या घटकांपर्यंत न्याय देण्याचे काम केले आहे. असे काडादी म्हणाले.
धर्मराज काडादी यांचे मोठं विधान
मात्र,गेल्या काही वर्षांत दक्षिण’ला विकासात्मक नेतृत्व लाभले नाही. जुन्या नेत्यांनी पाहिलेले विकासात्मक स्वप्न नव्या नेतृत्वाकडून पूर्ण झाले नाही.तेव्हा ‘दक्षिण’ला पुन्हा प्रगतीपथावर आणण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडविणे गरजेचे आहे.जनतेची इच्छा असेल आणि पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी दिल्यास आपण विधानसभा निवडणूक लढण्यास तयार आहोत अशी ग्वाही धर्मराज काडादी यांनी दिली.
गुरुवारी, हत्तूर येथील ग्रामदैवत श्री सोमेश्वर आणि बन्नसिध्देश्वर मंदिरात तसेच वडकबाळ येथे कट्टव्वादेवी, वांगी येथे महादेव व हनुमान मंदीरात नारळ वाढवून धर्मराज काडादी यांच्या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्री. स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, माजी सभापती महादेव चाकोते, माजी सभापती गुरूसिध्द म्हेत्रे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते, संचालक गुरूराज माळगे, शिवानंद पाटील (कुडल)विद्यासागर मुलगे, प्रमोद बिराजदार, शिवशंकर बिराजदार, सिध्दाराम व्हनमाने, अशोक निंबर्गी, प्रभूराज मैंदर्गी, सूर्यकांत पाटील, राजशेखर भरले, भीमाशंकर सतूबर, भीमाशंकर कनपवडियार,सोमनिंग कनपवडियार,बिळेणी पट्टेवडियार, सोमनाथ कोळी, राजशेखर वाले, शंभूराजे भरले,महांतेश उपासे,चिदानंद जवळकोटे, सुभाष बिराजदार,राधाकृष्ण पाटील,संजय पोतदार,विजयकुमार मुलगे,प्रकाश विभूते, महादेव भोपळे, महादेव वाघमोडे, चन्नप्पा बनशेट्टी, काशीनाथ गौडगुंडे, प्रभू सर्वगोड, रशीद शेख आदी उपस्थित होते.
भाजपने त्रास देण्याचे काम केले
यावेळी काडादी म्हणाले, भाजपने गेल्या दहा वर्षात श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यासह या परिवारातील सार्वजनिक इतर संस्थेलाही त्रास देण्याचे काम केले आहे. चांगल्या संस्था कसे अडचणीत येतील यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक कारस्थाने केली आहेत. विमानसेवेच्या नावाखाली कारखान्याची चिमणी पाडून हजारो शेतकरी, सभासद बांधवांच्या अस्मिता आणि स्वाभिमानाला धक्का दिला.कारखान्याचे मोठे नुकसान केले आहे.पुन्हा दहा कोटी उभारून जुनी चिमणीवर दहा लाखांचे ऊस गाळप करून जिल्हातच उच्चांकी ऊसदर दिला आहे. सार्वजानिक
संस्थेला अडचणीत आणणाऱ्या आणि शेतकरी सभासदांचे आर्थिक नुकसान करणाऱ्या भाजपला जागा दाखविण्यासाठी आपण लोकसभा निवडणुकीत बाहेर पडलो आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे व माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा प्रचार केला.
या निवडणुकीनंतर आपण संस्थात्मक कार्यात व्यस्त होतो. मात्र,दक्षिण सोलापुरात चुकीचे राजकारण घडत असल्याने तालुक्याला विकासात्मक नेतृत्वाची गरज असल्याची साद येथील नेतेमंडळींनी आपल्याला घातली. आपल्या ‘गंगा’ या निवासस्थानात झालेल्या बैठकीत नेतेमंडळी मी, ‘दक्षिण’ची निवडणूक लढवावी असा आग्रह धरला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे शिष्टमंडळाने तशी इच्छाही दर्शवली आहे. जनतेची इच्छा असेल आणि महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उध्दव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे व विजयसिंह मोहिते-पाटील या पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी दिल्यास आपण ‘दक्षिण’च्या समस्या सोडविण्यासाठी विधानसभेची निवडणूक लढण्यास तयार आहोत. येणाऱ्या काळातही शेतकरी व जनतेनी विकासात्मक धोरण असणाऱ्या आणि सर्वांनाच सोबत घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी राहावेत असे आवाहन करून शेतकऱ्यांची ऊस बील दहा दिवसात देण्यात येतील असेही त्यांनी यावेळी शेवटी बोलताना सांगितले.