कोल्हापूर,दि.10: भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबाबत अजब वक्तव्य केले आहे. महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला 1500 रूपये मिळतात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पंधराशे रुपयांचा लाभ घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत आढळल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, नावे लिहून घ्या, घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गायचं त्यांचं, असं नाही चालणार असे वक्तव्य धनंजय महाडिक यांनी केले आहे.
त्यांचे फोटो काढायचे आणि…
आज महाराष्ट्रात अनेक तांया (ताई) छाती बडवून सांगत आहेत की, आम्हाला पैसे नकोत. सुरक्षा पाहिजे. पैसे नकोत, राजकारण करताय यांचे ? काँग्रेसच्या सभेत महिला दिसल्या तर फोटो काढून घ्या त्यांचे, काँग्रेसच्या रॅलीला महिला दिसल्या जाऊन त्यांचे फोटो काढायचे आणि आमच्याकडे पाठवा आम्ही व्यवस्था करतो, अशा शब्दांत भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबाबत वादग्रस्त व अवमानकारक वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्याचे आता राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक यांच्या प्रचार सभेत त्यांनी वक्तव्य केले.
महायुती सरकार महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला 1500 रूपये देत आहे. तर महाविकास आघाडी कडूनही लाडक्या बहिणीसाठी तीन हजार रुपये देण्याची घोषणा वचननाम्यात करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला असतानाच, या योजनेवरून महायुतीच्या नेत्यांमध्ये अहंकार पसरल्याचे दिसून येत आहे.
तिला एक फॉर्म द्यायचा…
जर मोठ्याने कोण भाषण करायला लागली. दारात आली तर तिला एक फॉर्म द्यायचा. खाली सही कर म्हणायचे. लगेच उद्या पैसे बंद करतो म्हणायचे. आमच्याकडे काय लय पैसे झालेले नाहीत, असे वक्तव्यही त्यांनी केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.