सोलापूरचे भाविक तिरुपतीत अडकले, सोलापूरहून गाडी मागवून परतले

0

सोलापूर,दि.२३: सोलापूरचे अनेक भाविक तिरुपतीत (tirupati) अडकले आहेत. सोलापूरहून तिरुपती बालाजीला (Tirupati Balaji) जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशात पावसाने हाहाकार माजवला. तेथील जगप्रसिद्ध तिरुपती मंदिर परिसराला पाण्याने वेढा दिला होता. शिवाय मंदिरात पाणी शिरल्याने अनेक भाविक अडकले होते. मात्र, पाण्यात अडकलेल्या भाविकांना सुखरूपपणे बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलवलं. भीतीदायक परिस्थिती पाहता दर्शनासाठी गेलेल्या सोलापुरातील भाविकांनी सोलापूरहून गाडी मागवून सुखरूपपणे स्वगृही परतल्याचे सांगण्यात आले.

३० हजार रुपये भाडे

तिरुपतीहून सोलापूरला येण्यासाठी तेथून खासगी गाडी करण्यासाठी विचारपूस केली असता, ५० ते ५५ हजार भाडे सांगितले. त्यामुळे सोलापूरला मित्रांना फोन करून सर्व माहिती सांगितली, मित्रांनी सोलापूरहून ३० हजार भाडे ठरवून खास गाडी करून तिरुपतीला थेट पाठविली, त्यानंतर सोमवारी सायंकाळी उशिरा आम्ही सुखरूपपणे स्वगृही परतल्याचे अतिवृष्टीत अडकलेल्या एका भाविकाने सांगितले.

अनेक सोलापूरकर लॉजवर

बालाजी मंदिर परिसरात पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर अनेकांना मंदिरातून बाहेर काढण्यात आले. त्यातील शेकडो सोलापूरकर पाण्याचा प्रवाह कमी होईल, या आशेने लॉजवर थांबले होते. शिवाय काही खासगी वाहने करून आलेल्या भाविकांनी मात्र परिस्थितीचा अंदाज पाहून सोलापूरकडे मार्गस्थ झाले.

दक्षिण मध्य रेल्वेमधील गुंटकल विभागातील रजमपेठा-नंदालूरदरम्यान जोरदार पावसामुळे रुळावर पाणी थांबले आहे. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. दरम्यान, काही गाड्या रद्द केल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. शिवाय जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने चेन्नईकडे जाणारी रस्ते वाहतूक बंद पडल्याचे सांगण्यात आले. अशातच बालाजी दर्शनासाठी गेलेल्या सोलापूरकर भाविकांना या पर्जन्यवृष्टीचा चांगलाच फटका बसला. अचानक आलेल्या हा पाऊस व त्यात एसटी सेवा बंदमुळे मोठी गैरसोय झाल्याचे भाविकांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here