मुंबई,दि.10: राष्ट्रवादीचे नेते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मलिकांनी यावेळी म्हटलं की, जेव्हा नोटबंदी झाली त्यावेळी खोट्या नोटा पकडले जाण्याचं प्रमाण संपूर्ण देशभरात वाढलं होतं. मात्र महाराष्ट्रातून खोट्या नोटांचं एकही प्रकरण समोर आलं नाही. 8 ऑक्टोबर 2017 मध्ये इंटेलिजन्सकडून बीकेसीमध्ये छापेमारी झाली. ज्यात 14 कोटी 56 लाखांच्या खोट्या नोटा सापडल्या. या प्रकरणाला फडणवीसांकडून दाबलं जाण्याकरता प्रयत्न झाले, असं ते म्हणाले.
नवाब मलिकांच्या रडारवर देवेंद्र फडणवीस आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या काळात फडणवीस यांनी अंडरवर्ल्डमधील काही लोकांना व कुख्यात गुंडांना खुलेआम संरक्षण दिलं होतं, असा आरोप त्यांनी केला आहे. नवाब मलिकांच्या या आरोपांवर आता देवेंद्र फडणवीसांनी अप्रत्यक्षरित्या उत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीसांनी एक ट्वीट केलं आहे. फडणवीसांनी ट्वीटमध्ये एक सुविचार शेअर केला आहे. जॉर्ज बर्नाड शॉ यांचा हा सुविचार आहे. आपण डुकरासोबत कुस्ती खेळू नये, हे मी खूप पूर्वी शिकलोय. डुकरासोबत कुस्ती खेळल्याने आपल्याच अंगावर चिखल उडतो आणि तेच डुकराला आवडतं, असा आशय असलेला सुविचार देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. अप्रत्यक्षरित्या फडणवीसांनी नवाब मलिकांवर निशाणा साधला आहे.