सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोठ्या घोषणा 

0

सोलापूर,दि.११: सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Solapur) यांची काल (दि.१०) सोलापूरमध्ये सभा झाली. यावेळी फडणवीस यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. महापालिकेच्या १०२ जागांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात सोलापूर शहराला दररोज पाणी, विमानसेवा, ई बसेस, आयटी पार्क आदींवर भर दिला. 

सोलापूर शहरात सध्या ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यांची यात्रा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे सभास्थानी बाराबंदीत आले. उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईनचे काम पूर्ण केले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात शहरात पाणीपुरवठ्यासाठी साडेआठशे कोटी रुपये दिले आहेत. त्याचे टेंडरही काढलं. सोलापूरच्या प्रत्येक घरात दररोज पिण्याचे स्वच्छ पाणी आणल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. असे फडणवीस म्हणाले. 

आम्ही आश्वासन देणारे नाही, तर…

सोलापुरात आयटी पार्क उभारण्याची इथली तरुणांची मागणी होती. त्यासाठी जाागा निश्चित झाली असून आधुनिक आयटी पार्क तयार करून सोलापूरच्या तरुणांना काम मिळवून देणार आहोत. यंत्रमाग उद्योगाला सवलती देऊन त्याला उभारी देण्यासाठी सोलापुरात इचलकरंजी पॅटर्न राबविल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आश्वासन देणारे नाही, तर काम करणारे आहोत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सोलापूरची ओळख चादर, कडक भाकरी, हुरडा, शेंगा चटणी जशी आहे त्याचसोबत सोलापूरला आधुनिक शहराची ओळख मिळवून देण्याचे आमचे स्वप्न आहे. सोलापूरसाठी नाशिक – सोलापूर – अक्कलकोट असा महामार्ग मंजूर केला आहे. हा रस्ता देशातील सर्वात मोठे बंदर असलेल्या वाढवण बंदराला जोडत असल्यामुळे या परिसरात औद्योगिकरणाकरता नवी इकोसिस्टीम तयार होणार आहे. तसेच हा रस्ता मुंबई – दिल्ली महामार्गालाही जोडण्यात येणार आहे. त्यामुळे सोलापूरच्या विकासाची गती वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. याचा परिणाम म्हणजे सोलापूर हे भविष्यात पर्यटनाचे इंजिन म्हणून काम करणार असल्याचे सूतोवाच त्यांनी दिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here