Ashwini Vaishnaw: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जोडले रेल्वेसमोर हात; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

0

मुंबई,दि.5: Ashwini Vaishnaw: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी संध्याकाळी शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरू- हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, मालगाडी तीन रेल्वेगाड्यांना झालेल्या भीषण अपघातात मरण पावलेल्यांची संख्या 288 वर पोहोचली असून 1175 हून अधिक जण जखमी झाले आहेत. (Odisha Train Accident) जवळपास 48 तासांहून अधिक काळ वाहतूक खोळंबल्यानंतर अखेर रविवारी रात्री उशीरा ओडिशाच्या बालासोर रेल्वे स्थानकावरू वाहतूक सुरू करण्यात आली.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जोडले हात | Ashwini Vaishnaw

यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हेही उपस्थित होते. एकीकडे ओडिशामध्ये झालेल्या अपघातासाठी विरोधकांकडून केंद्र सरकारला जबाबदार धरलं जात असताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे अश्विनी वैष्णव यांचा रेल्वेसमोर हात जोडलेला फोटो व्हायरल होत आहे. खुद्द वैष्णव यांच्या ट्विटर हँडलवरून बालासोर रेल्वे स्थानकावरू डाऊन लाईनवरची वाहतूक सुरू झाल्याचा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) त्यांचं कौतुक केलं आहे.

बालासोरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास झालेल्या भीषण तिहेरी रेल्वे अपघातामध्ये तब्बल 288 प्रवासांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याशिवाय शेकडो जखमींवर रुग्णालयांत उपचार चालू आहेत. या पार्श्वभूमीवर अपघाताच्या कारणांची चौकशी केली जात असून यामागे तांत्रिक बिघाड की मानवी बेजबाबदारपणा आहे, याचा तपास केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधकांकडून अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच त्यांचा हा व्हिडीओ आणि यावेळचे फोटो व्हायरल होत आहेत.

बालासोर या रेल्वे स्थानकावरून रेल्वेवाहतूक सुरू

रविवारी रात्री उशीरा ओडिशाच्या बालासोर या रेल्वे स्थानकावरून रेल्वेवाहतूक सुरू झाली. यावेळी खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हेही उपस्थित होते. यावेळी रेल्वे स्थानकावरून डाऊन लाईनवरून निघालेल्या रेल्वेसमोर अश्विनी वैष्णव यांनी हात जोडलेला फोटो व्हायरल झाला आहे. या प्रसंगाचा व्हिडीओ अश्विनी वैष्णव यांनी ट्वीट केला आहे.

“डाऊन लाईनवरचं दुरुस्तीकाम पूर्ण झालं. या लाईनवरून पहिली ट्रेन निघाली”, असं ट्वीट या व्हिडीओवर वैष्णव यांनी केलं आहे.

देवेंद्र फडणवीसांची स्तुतिसुमनं!

दरम्यान, अश्विनी वैष्णव यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत. “अश्विनीजी, तुम्ही अगदी शब्दश: तिथे या सगळ्या कोलाहलात उभे राहिलात. तिथल्या प्रत्येक सदस्याला सोबत केलीत. तिथे रेल्वे वाहतूक पूर्ववत होईपर्यंत तुम्ही तिथे थांबलात. हे अतिशय उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहे. तुमच्यासारखे नेते लोकांना सेवा देत आहेत आणि त्यांचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत हे देशाचं भाग्य आहे”, असं आपल्या ट्वीटमध्ये देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या अपघाताची सध्या सविस्तर चौकशी चालू असून आता त्याची सीबीआयकडून चौकशी केली जावी, अशी मागणी केली जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here